Latest

हिंगोली : औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; वसमत-नांदेड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

अविनाश सुतार

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : नांदेड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीशकालीन पूल अखेर शुक्रवारी (दि.२१) दुपारी कोसळला. शुक्रवारी पहाटेपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु असून ओढ्याला आलेल्या पुरामुळे पुलाचा आधार असलेला खालील भाग निखळला होता. तसेच रस्त्यावर तडे गेले होते. यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.

औंढा नागनाथ तालुक्यात शुक्रवारी पहाटे 4 पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील येळेगाव सोळंके, जवळा बाजार, शिरडशहापूर, पिंपळदरी, पोटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले, ओढे तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीशकालीन पुलाचा खालील भाग पुराच्या पाण्यामुळे निखळल्याने वरील भागाला भेगा पडल्या होत्या. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

चौंडी शहापूर येथील ओढ्यावर असलेला हा पूल ब्रिटीशकालीन होता. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाच्या डागडुजीचा प्रश्न प्रलंबित होता. नांदेड आणि औरंगाबादला जोडणार्‍या या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. यामुळे शुक्रवारी पहाटे रस्त्याला तडे गेल्यानंतर वाहतूक बंद होताच. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी कमकुवत झालेला पूल कोसळला. ओढा मोठा असून सातत्याने पाऊस सुरु असल्याने नवीन पूल उभारण्यास मोठा कालावधी लागणार आहे. यामुळे आता प्रवाशांनी नागेशवाडी फाट्यावरून औंढा- जवळा बाजार- हट्टा- वसमत ते नांदेड या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT