Latest

Hindi Diwas : याच दिवशी हिंदी भाषेला मिळाला होता राजभाषेचा दर्जा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत हा एक बहुभाषिक असलेला देश आहे. सुमारे १६०० बोलीभाषा बोलणाऱ्या आपल्या देशात हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. विविधतेतून एकता आणणारी भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं. आज राष्ट्रीय हिंदी दिन… आजच्याच दिवशी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. या दिवसाचे औचित्य साधत हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता, या भाषेतलं सौंदर्य, हिंदी साहित्य जगासमोर आणण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा करतात. (Hindi Diwas) आपल्या भारतात २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४३.६३  टक्के लोक हे हिंदी बोलतात. आज आपण राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त या दिनाचा इतिहास आणि महत्व समजून घेवूया…

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्या दोन वर्षांनी म्हणजे १९४९ साली १४ सप्टेंबर रोजी  भारतीय घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. राजभाषेच्या संदर्भात असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या  भाग-१७ मध्ये करण्यात आल्या. १७ व्या भागात परिच्छेद ३४३ पासून ३५१ पर्यंत जी कलमे नमूद आहेत, त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून, तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. या ऐतिहासिक महत्त्वामुळे १९५३ पासुन राष्ट्रभाषा प्रचार समितीतर्फे  १४ सप्टेंबर हा 'हिंदी दिन' साजरा केला जातो.

Hindi Diwas : हिंदी भाषेच्या काही रंजक गोष्टी

  • भारतात पहिल्यांदा हिंदी दिवस १९५३ साली १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.

  • जसा आपल्या भारतात हिंदी दिन साजरा करतात तसाच जागतिक स्तरावरही हिंदी दिन साजरा केला जातो. १० जानेवारी हा विश्व हिंदी दिवस साजरा करतात.

  • भारतात 1600 हून अधिक बोली भाषा आहेत. यातील हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. 

  • जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलणाऱ्या पहिल्या पाच भाषांमध्ये हिंदीचा समावेश होतो. 

  • हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार ३९.२९ टक्के तर २००१ च्या जनगणनेनुसार ४१.३ टक्के तर २०११ च्या जनगणनेनुसार ४३.६३ टक्के लोक हिंदी बोलतात

  •  भारतासह पाकिस्‍तान, बांग्‍लादेश, युगांडा, गुयाना, सूरीनाम, मॉरिशस, साउथ अफ्रीका अमेरिका, ब्रिटेन आदी देशात हिंदी भाषिक आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT