Latest

Himachal Pradesh Election | हिमाचलचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार; सुखविंदर सिंह सुक्खू, मुकेश अग्निहोत्री, की प्रतिभा सिंह?

दीपक दि. भांदिगरे

शिमला (हिमाचल प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Election) मतदारांनी आपली परंपरा यावेळीही कायम ठेवली. म्हणजेच दर पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यावेळीही मतदारांनी सरकार बदलून टाकले आहे. राज्याच्या ६८ पैकी ४० मतदारसंघांतून काँग्रेसचा विजय झालेला असून बहुमतासाठीचा ३५ हा आकडा काँग्रेसने पार केला. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, विजयानंतर हिमाचल काँग्रेस विधिमंडळ दलाची बैठक आज शुक्रवारी (दि.९) दुपारी ३ वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसचे हिमाचल प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडाही सहभागी होणार आहेत.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रतिभा सिंह तसेच माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी असून, मंडीच्या खासदारही आहेत. सीएलपी नेते मुकेश अग्निहोत्री यांचेही नाव चर्चेत आहे. याआधी गुरुवारी शुक्ला यांनी म्हटले होते की, हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षप्रमुख ठरवतील.

२०१७ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यावेळी १९ जागांचे नुकसान झाले. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. आम आदमी पक्ष या राज्यात खातेही उघडू शकला नाही. निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने नवीन सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून चंदीगडमध्ये नवोदित आमदारांची बैठक बोलावली आहे.

हिमाचलमध्ये प्रत्येक निवडणुकीत ४५ ते ७५ टक्के मंत्री पराभूत होतात, असा आजवरचा अनुभव आहे. यावेळीही तसेच झाले. दहापैकी ८ विद्यमान मंत्री यावेळी पराभूत झाले. सुरेश भारद्वाज, रामलाल मारकंडा, वीरेंद्र कंवर, गोविंदसिंह ठाकूर, राकेश पठाणिया, डॉ. राजीव सैजल, सरवीण चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा त्यात समावेश आहे. जयराम ठाकूर यांच्यासह बिक्रम ठाकूर आणि सुखराम चौधरी यांनी निवडणूक जिंकली आहे. (Himachal Pradesh Election)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT