Latest

महाराष्ट्रात सर्वाधिक २६ हजार कोटींचे जीएसटी संकलन

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या आर्थिक विकासाचे मोठे केंद्र असलेल्या महाराष्ट्रातून जून महिन्यात सर्वाधिक वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज ( दि. १) दिली. ( Maharashtra GST collection ) जून २०२३ दरम्यान राज्यात तब्बल २६,०९८.७८ कोटींचा जीएसटी प्राप्त झाला. जून २०२२ च्या २२,३४१.४० कोटींच्या तुलनेत हे संकलन १७ पटीने अधिक आहे, हे विशेष.

जून २०२३ मध्ये जीएसटीचे संकलनात वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती देखील अर्थमंत्रालयाने दिली. मंत्रालयानूसार, गेल्या महिन्याभरात जवळपास १ लाख ६१ हजार ४९७ कोटींचा जीएसटी संकलित करण्यात आला.हा महसूल जून २०२२ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. देशात १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर चौथ्यांदा जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे शनिवारी जीएसटी कर रचनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत सरासरी जीएसटी संकलन अनुक्रमे १.१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६९ लाख कोटी एवढे होते.यावरून जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात संकलित जीएसटीमध्ये ३१ हजार १३ कोटी रुपये सेंट्रल जीएसटी आणि ३८ हजार २९२ कोटी रुपये स्टेट जीएसटी आहे. तर, इंटीग्रेटिड जीएसटी ८० हजार २९२ कोटी संकलित झाला. ३९ हजार ३५ कोटी रुपये आयातावर लावण्यात आलेल्या जीएसटीमधून गोळा झाला. तर, ११ हजार ९०० कोटींचा महसुल सेस मधून मिळाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.एप्रिल २०२३ मध्ये विक्रमी १.८७ लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलित करण्यात आला होता.तर, मे महिन्यात १.५७ लाख कोटींचे जीएसटी महसुल मिळाले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT