Latest

कौतुकास्पद ! एक एकर बाजरीचे पीक त्यांनी ठेवले पक्ष्यांसाठी राखून

अमृता चौगुले

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : अलीकडे पक्ष्यांची किलबिल पाहावयास मिळत नाही. पक्ष्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. अशावेळी कसबा बारामती येथील जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता उद्धव दिगंबर मोरे यांनी आपल्या शेतातील एक एकर बाजरीचे पीक पक्ष्यांना खाण्यासाठी सोडून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. उद्धव मोरे यांची येथील निरा डावा कालव्यानजीक शेती आहे. त्यांनी जून महिन्यात एक एकर बाजरी करण्यासाठी तुर्कस्तान येथून तीन किलो बाजरीचे बी ऑनलाइन मागवून त्याची पेरणी केली. नंतर वेळोवेळी आवश्यकतेनुसार खतांचे डोस आणि सिंचन केले.

संबंधित बातम्या :

सध्या बाजरीचे हे पीक मोठ्या जोमात डौलाने शेतात उभे आहे. त्याच्या कणसाची लांबी जवळपास 3 ते 5 फूट एवढी आहे, तसेच त्याचे एकरी उत्पादन 40 ते 50 क्विंटल मिळते. गावरान बाजरीचे कणीस साधारणपणे 9 इंच लांबीचे असून, एकरी 12 ते 18 क्विंटल उत्पादन मिळते. मोरे यांच्या शेताजवळ अनेक प्रकारची झाडे आहेत. पूर्वी येथे अनेक पक्ष्यांचे थवे दिसत, तर पक्ष्यांचा किलबिलाट जाणवत असे. त्यामुळे वातावरण निसर्गरम्य होत असे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पक्ष्यांचा चिवचिवाट कमी झाला असल्याचे मोरे यांच्या लक्षात आले. दरम्यान, बाजरीच्या पिकाभोवती काही पक्षी येत असल्याचे जाणवल्यावर त्यांनी पक्षीप्रेमापोटी तसेच पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, त्यांचा किलबिलाट कानी पडावा, त्यांची संख्या वाढवी या उद्देशाने हे एक एकर बाजरीचे पीक पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले. आजमितीला बाजारभावानुसार त्या बाजरीच्या पिकाची किंमत जवळपास 60 ते 75 हजार रुपये असल्याचे जाणकार सांगतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT