Latest

T20 Team India : रोहित शर्माच्या हातातून T20 चे कर्णधारपद निसटणार, रवी शास्त्रींचा दावा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 Team India : अगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. या ताज्या दमाच्या खेळाडूची निवड करताना हार्दिक पंड्याच्या शब्दाला खूप महत्त्व दिले जाईल. कारण त्या जागतिक स्पर्धेसाठी गुजरात टायटन्सच्या कर्णधाराला टीम इंडियाचे कायमस्वरुपी नेतृत्व देण्यात येईल असा दावा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.

कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही टी-20 (T20 Team India) संघ बांधणीच्या योजनांमध्ये ॲक्टीव्ह आहेत. परंतु ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर या वरिष्ठ खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

शास्त्री यांनी क्रीडा वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले की, 'मला वाटते की निवडकर्ते मोठ्या स्पर्धांना डोळ्यासमोर ठेऊन नवीन खेळाडूंना संधी देतील. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिभावान युवा फलंदाज अधोरेखीत झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियात पूर्णपणे नवीन नाही, पण त्यात अनेक नवखे चेहरे असतील यात शंका नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या टी-20 संघाने (T20 Team India) यशस्वी कामगिरी केली आहे. अशातच फिटनेसची समस्या नसल्यास त्याच्याकडे या फॉरमॅटमध्ये कायमस्वरूपी कर्णधार बनण्याची क्षमता आहे. 2007 प्रमाणे त्याच्या हाती ताजा संघ दिल्यास नक्कीच आपण वर्ल्डकप विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकतो,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2011 पासून भारतीय संघ वर्ल्डकपवर नाव कोरण्यात अपयशी ठरलेला आहे. त्याआधी 2007 मध्ये संघाने पहिला टी-20 वर्ल्डकप जिंऊन इतिहास रचला होता. त्या वर्षी या स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक तरुण चेहरे चमकले आणि एमएस धोनीच्या युवा संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना टी-20 फॉरमॅटमधून वगळण्यात आले होते

2022 च्या टी-20 वर्ल्डकप उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाची वाटचाल पुन्हा एकदा 2007 च्या स्टॅटेजी प्रमाणे सुरू आहे. त्या दृष्टीने पावलेही उचलण्यात आली आहेत. विराट, रोहित, भुवी आणि राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी टी-20 वर्ल्डकपनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याने संघाचे नेतृत्व करताना कसलीच कमतरता सोडलेली नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रिंकू सिंह यांसारख्या अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. हे खेळाडू टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहेत. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. आयपीएल युवा स्टार्सना त्या स्पर्धेसाठी संधी मिळणे अवघड आहे. पण हे सर्व खेळाडू टीम इंडियाच्या पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्कॉडचा भाग असू शकतात. त्यतच जर हार्दिक पंड्याच्या हाती कमान आली आणि युवा संघ सज्ज झाला, तर कदाचित 2007 च्या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT