Latest

Yash Dayal : रिंकूच्या 5 षटकाचा झटका यश दयालला असह्य, 8 किलोने वजन घटले! पंड्याने केला खुलासा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल (yash dayal) आठवतोय? तोच तो ज्याची गोलंदाजी कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंहने फोडून काढली होती. 9 एप्रिल रोजी झालेल्या त्या सामन्यात केकेआरच्या डावखु-या फलंदाजाने नाट्यमयरित्या 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकून आश्चर्यकारक विजय मिळवून दिला होता. रिंकू तर स्टार झाला, पण यश दयालचं नेमकं काय झालं आहे? तो कुठे आहे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

'त्या' सामन्यानंतर यश दयाल आजारी

केकेआरला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत 29 धावांची गरज होती. यश दयाल (yash dayal) शेवटचे षटक टाकत होता. पहिल्या चेंडूवर एक धाव काढल्यानंतर रिंकूकडे स्ट्राईक आले. यानंतर केकेआरच्या या फलंदाजाने यश दयालच्या पुढच्या पाचही चेंडूंवर पाच षटकार ठोकून इतिहास रचला. त्या सामन्यापासून यश दयाल गुजरातच्या प्लेइंग-11 मधून बाहेर आहे. कर्णधार हार्दिक पंड्याला याचे कारण विचारले असता त्याने आश्चर्यकारक खुलासा केला. 'त्या' सामन्यानंतर यश दयाल आजारी असल्याचे त्याने सांगितले आहे.

पुनरागमनाला अजून बराच अवधी

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना हार्दिक म्हणाला, 'यशच्या (yash dayal) पुनरागमनाबद्दल काहीही सांगू शकत नाही. तो सध्या आजारी आहे. त्याचे वजन सात ते आठ किलोने कमी झाले आहे. तो तापाने त्रस्त होता. शरीर अशक्त झाल्याने तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. मला वाटतं त्याच्या पुनरागमनाला अजून बराच अवधी आहे.'

कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण

दबावाची परिस्थिती हाताळता न आल्याने यशला गुजरातच्या प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात होते. या मोसमात त्याची कामगिरीही चांगली झालेली नाही. यंदाच्या आयपीएलमधील सुरुवातीच्या तीनही सामन्यांत तो खेळला पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मग केकेआरविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात त्याला ज्या प्रकारे झटका बसला तो कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण असेल.

गेल्या हंगामात यशची चमकदार कामगिरी

25 वर्षीय यश दयाल आयपीएलच्या गेल्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरला होता. त्याने 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या. पण त्याने 9 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT