Latest

“अल्पसंख्याकांविषयी वाढणारा द्वेष आणि तुमचे मौन धोकादायक”, १०८ अधिकाऱ्यांनी मोदींना लिहिले पत्र

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "देशामध्ये अल्पसंख्याक समाजाप्रती द्वेषाची भावना वाढू लागली आहे. नाईलाजाने आम्हाला अशा पद्धतीने आमचा संताप व्यक्त करावा लागत आहे", असं सांगत देशातील सध्यस्थितीवर भाष्य करणारं ३ पानी पत्र तब्बल १०८ सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक सनदी आणि पोलीस अधिकारीदेखील आहेत.

ज्येलिओ रिबेरो, रवी बुद्धिराजा, व्ही.पी.राजा, मीरा बोरवणकर, अण्णा दानी, अशा अनेक दिग्गज अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हे पत्र मंगळवारी पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे. "सामान्यपणे माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून अशा पद्धतीने टोकाला जाऊन आमच्या भावना व्यक्त करणं ही काही आमची इच्छा नसते. पण ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि वेदना अशा पद्धतीने व्यक्त करावा लागत आहेत", असे मत १०८ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

"आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भाजपाशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार वाढू लागला आहे. विशेषत: मुस्लीम समाजाचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या घटनांनी आता भयानक वळण घ्यायला सुरुवात केली आहे. सामाजिक सलोख्याला असणाऱ्या या धोक्याबाबत तुमचे मौन आम्हाला सुन्न करणारे आहे. यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षपाती विचारांना बाजूला सारून या सगळ्या प्रकाराला आळा घालतील अशी आम्हाला आशा आहे", असे स्पष्ट अधिकाऱ्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेले आहे.

पत्रामध्ये पुढे असे म्हटलेले आहे की, "देशात निर्माण झालेली ही परिस्थिती न भूतो न भविष्यती अशी आहे. कारण यामुळे फक्त देशाची घटनात्मक नैतिकता आणि आचरण धोक्यात आलेले नाही. जी सामाजिक रचना आपला सर्वात मोठा वारसा आहे आणि जिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीच आपल्या राज्यघटनेची मांडणी करण्यात आली आहे, तीच सामाजिक रचना आता उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे", अशी काळजीदेखील या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केलेली आहे.

पहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT