कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गावागावांत जल्लोष साजरा झाला. पराभूत उमेदवारांच्या गोटात शांतताही होती. अशावेळी समाजमाध्यमांवर 'झाले इलेक्शन, जपा रिलेशन' अशाप्रकारचे संदेश व्हायरल झाले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच गावातील वातावरण शांत करण्याचाच प्रयत्न या निमित्ताने सुरू होता.
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांत नेहमीच प्रचंड ईर्ष्या असते. हा सत्तासंघर्ष प्रत्येक गल्लीत आणि घरापर्यंतही पोहोचलेला असतो. गेले दहा ते बारा दिवस या संघर्षाने जिल्हा ढवळून निघाला आहे. निकाल जाहीर होताच काही ठिकाणी तणावही होऊ शकतो. तसेच ग्रामपंचायतीतील निवडणूक निकालाचे उट्टे एरव्हीच्या दैनंदिन कामात काढले जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे राजकीय सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी गावागावांतील समजूतदार लोकांनी अशाप्रकारचे संदेश व्हायरल केले आहेत. अशा संदेशांनाही समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळतोय.
'गुलाल कोणाचीही असो, माणसे आपलीच आहेत. कोणताही जय, पराजय हा अंतिम नसतो. शांत राहा, संयमी राहा. मागील 15 दिवसांत ज्या लोकांना हात जोडत होता, त्यांना त्रास होईल असे न वागता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, भविष्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक व्हा. निवडणुका संपल्या. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आपापल्या कामाला लागा. हरणार्यांनी मोठ्या मनाने पराभव मान्य करावा, जिंकणार्यांनी विजयाचा उद्रेक करू नये,' असे आवाहनही समाजमाध्यमांवरून केले जात होते.
Gram Panchayat Election : रक्ताची नातीही प्रतिस्पर्धी
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी रक्तातील नातीही एकमेकांविरोधात लढली आहेत. अशामुळे नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे. भाऊबंदकीमध्ये वादाला तर निवडणुकीचीच किनार असते. पराभवाचे खापरही भावकीवरच फोडले जाते. त्यामुळे वाद उफाळून येतात. हे टाळण्यासाठीही काही ठिकाणांवरून प्रयत्न होताना दिसले. त्यासाठी असे चांगले संदेश समाजमाध्यांमवर गाजले. दोन दिवस अशाप्रकारचे संदेश माध्यमांद्वारे बिंबवण्यात आले.
Gram Panchayat Election : दोस्तीतही दुरावे, गल्लीत दुफळ्या
एरव्ही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असणारे आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असणार्या मैत्रीच्या नात्यातही काही ठिकाणी या राजकारणामुळे कटुता आली आहे. कुठे भाऊबंदकीसाठी मैत्री तुटली; तर काही ठिकाणी मैत्रीसाठी भाऊबंदकीत वांदे झाले. त्यामुळे 'झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन' हा माध्यमांवरील संदेश सर्वांनाच भावला. प्रत्येकाशी संबंधित असणारा हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला आहे.