Latest

खुशखबर! यंदा मान्सूनची लवकर हजेरी; अशी असेल मान्सूनची स्थिती

Laxman Dhenge

पुणे : हवेचे दाब यंदा मान्सून लवकर येण्याची वर्दी देत आहेत. यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे हवेचे दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाले असून सध्या ते दाब ७०० वरून ८५० हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत. मान्सूनची हालचाल आणि नंतरची सर्व प्रगती ही हवेच्या दाबांवर अवलंबून असते. हवेचे दाब हे समुद्रावर १००० हेक्टा पास्कलवर गेले की मान्सूनची निर्मिती सुरू होते.

हवेचे दाब १००६ वर गेले की, मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हे दाब १००८ वर गेले की, तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो. यंदा हवेचे दाब मान्सूनसाठी लवकर अनुकूल होत आहेत, असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे 21 दिवस उरले आहेत. दरवर्षी मान्सून 18 ते 20 मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचे दाब अनुकूल झाले तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे.

असे असते हवेच्या दाबाचे गणित

हवेचे दाब हे हेक्टा पास्कल या एककात मोजले जातात. 25 एप्रिल रोजी हवेचे दाब 500 हेक्टा पास्कलवर होते. 28 एप्रिल रोजी ते 700 हेक्टा पास्कलवर गेले, तर 29 एप्रिल रोजी एकदम 850 हेक्टा पास्कल इतके झाले. हा दाब जेव्हा 1000 हेक्टा पास्कलवर जाईल, तेव्हा मान्सूनला वेग येईल. समुद्रावर जेव्हा हवेचे दाब 1006 वर जातील, तेव्हा तो अंदामानात दाखल होईल. हेच दाब 1008 वर गेले की, तो केरळमध्ये येतो. कारण समुद्रावर हवेच दाब वाढले की देशाच्या इतर भागांत ते कमी म्हणजे 1002 च्या आसपास असतात. ज्या दिशेने दाब कमी त्या दिशेने मान्सूनचे वारे भारतात येतात.

हिंदी महासागराचे तापमान आणि हवेचे दाब यावर मान्सूनच्या हालचाली ठरतात. यंदा हवेचे दाब मासूनला आतापासूनच पूरक वाटत आहेत. अंदमानात मान्सून २० मेच्या सुमारास येतो. म्हणजेच अजून २१ दिवस बाकी आहेत. हवेचे दाब जर आणखी वेगाने वाढले, तर तो त्या क्षा लवकर येऊ शकतो.

डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT