Latest

Gold Price Today | सोन्याने गाठला उच्चांक, प्रति तोळा ६१ हजारांवर, जाणून घ्या दरवाढीचे कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. डॉलर कमजोर झाल्याने आज बुधवारी (दि. ५) मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने प्रति १० ग्रॅम ६०,९६४ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर काल सोन्याने ६१ हजारांवर जाऊन व्यवहार केला होता. अमेरिकेतील कमकुवत आर्थिक स्थितीमुळे डॉलर इंडेक्स घसरला आहे. तो दोन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आला आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. मंगळवारचे सत्र संपण्यापूर्वी जून फ्युचर्स सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६१,१४५ रुपयांवर पोहोचला होता. ही दरवाढ १.६२ टक्के म्हणजेच ९७० रुपयांची आहे. दरम्यान, चांदी फ्युचर्सचा दर २,५७० रुपयांनी वाढून प्रति किलो ७४,७०० रुपयांवर गेला आहे. (Gold Price Today)

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्सच्या माहितीनुसार, आज ५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,९७७ रुपयांवर खुला झाला. तर २३ कॅरेटचा दर ६०,७३३ रुपये, २२ कॅरेट ५५,८५५ रुपये, १८ कॅरेटचा दर ४५,७३३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,६७२ रुपयांवर होता. चांदीचा दर प्रति किलो ७४,५२२ रुपयांवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दराचा उच्चांक

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. येथे सोन्याचा दर प्रति औंस २,०२५ डॉलरवर पोहोचला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात २००८ मध्ये सोन्याचा दर २,०७५ डॉलरवर गेला होता. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये सोने २,०७० डॉलरवर होते. अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सोन्याचा दर २ टक्क्यांने वाढून प्रति औंस २ हजार डॉलर पार झाला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्सच्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,७१५ रुपयांवर होता. तर २३ कॅरेटचा दर ५९,४७६ रुपये, २२ कॅरेट ५४,६९९ रुपये आणि १८ कॅरेटचा दर ४४,७८६ रुपये होता.

सहा अंकी हॉलमार्क असलेले सोने वैध

केंद्र सरकारकडून सोने खरेदीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून हे बदल करण्यात आले आहेत. ३१ मार्चनंतर हॉलमार्क असलेले सोनेच वैध मानले जात आहे. हॉलमार्क नसलेले सोने अवैध असेल. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चपासून सोने खरेदी करण्याच्या नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूडी) चिन्हाशिवाय कोणताही ज्वेलर सोन्याचे दागिने विकू शकणार नाहीत. देशात बनावट दागिन्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क गोंधळामुळे मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहा अंकी हॉलमार्कशिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.

आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येतील. बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून बर्‍याच काळापासून प्रयत्न सुरू आहेत. 'एचयूडी' म्हणजे 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक. या क्रमांकावरून सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते. सोन्याचे दागिने किंवा वस्तूवर हा क्रमांक असतो. या नंबरवरून सोन्याच्या दागिन्याबाबत संपूर्ण माहिती समजते. याआधी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क क्रमांक होते; मात्र आता सरकारने चार अंकी हॉलमार्कवर बंदी घातली असून फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे. ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. देशभरात एकूण १ हजार ३३८ हॉलमार्किंग केंद्रे असून आणखी केंद्रे उभारली जात आहेत. (Gold Price Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT