Latest

गत आर्थिक वर्षातील अकरा महिन्‍यांत सोन्याची आयात 30 टक्क्यांनी घटली

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गत आर्थिक वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांच्या कालावधीत सोन्याची आयात 30 टक्क्यांनी घटली आहे. या काळात 31.8 अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीच्या सोन्याची आयात झाली. तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात हीच आयात 45.2 अब्ज डॉलर्स इतकी होती, असे व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ तसेच आर्थिक अस्थिरता ही सोन्याची आयात घटल्याची प्रमुख कारणे आहेत. सोन्याच्या आयातीमध्ये ऑगस्ट 2022 पासून सुरु असलेली घसरण अजूनही थांबलेली नाही. विशेष म्हणजे गत एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत चांदीची आयात 66 टक्क्याने वाढली आहे. व्यापार तोटा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील कर वाढविला होता. तथापि प्रत्यक्षात आयात कर वाढवून देखील व्यापार तूट कमी झालेली नाही.

एप्रिल ते फेब्रुवारी 2023 या काळातील देशाची व्यापार तूट 172.53 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत वाढून 247.52 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी सोन्यावरील आयात कर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर नेला होता. देशात दरवर्षी सुमारे 800 ते 900 टन सोन्याची आयात केली जाते. यातील बहुतांश सोन्याचा वापर दागिने बनविण्यासाठी केला जातो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT