Latest

Gold Price Today | सोने एका दिवसात १,७०० रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचा प्रति तोळा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज सोमवारी (दि. १ एप्रिल) सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम म्हणजेच प्रति तोळ्यामागे १,७१२ रुपयांची वाढ झाली. आज शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,९६४ रुपयांवर खुला झाला. २८ मार्च रोजी हाच दर प्रति १० ग्रॅम ६७,२५२ रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, आज चांदीचा दर प्रति किलो ७४,१२७ रुपयांवरून ७५,४०० रुपयांवर पोहोचला. (Gold Price Today)

मार्च महिन्यात सोन्याच्या दरात ४,६६० रुपयांची वाढ झाली होती. आता आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने एका दिवसात १,७१२ रुपयांनी महागले आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज सोमवारी २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६८,९६४ रुपये, २२ कॅरेट ६३,१७१ रुपये, १८ कॅरेट ५१,७२३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४०,३४४ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७५,४०० रुपयांवर खुला झाला आहे.

दरम्यान, आज एमसीएक्सवर सोन्याचा दर सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे १८०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६९,४८७ रुपयांवर पोहोचला. सोने दराचा हा नवा उच्चांक आहे. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर एप्रिल गोल्ड फ्यूचर्सचा दर सुमारे १,२५० वाढून प्रति १० ग्रॅम ६८,९३० रुपयांवर गेला. तर सिल्वर फ्यूचर्सने ७०० रुपयांहून अधिक वाढून प्रति किलो ७५,७८७ रुपयांवर व्यवहार केला.

तर जून डिलिव्हरी सोने १.८० टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६८,९१० रुपयांवर गेले. तर चांदी १.२८ टक्क्यांनी वाढून प्रति किलो ७६ हजारांवर पोहोचली आहे. (Gold Price Today)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तेजीत

अमेरिकेतील महागाईत घट झाल्याने फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये वर्षातील पहिली व्याजदर कपात करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोने दराने आज नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला २,२५९ डॉलरचा सर्वकालिन उच्चांक गाठल्यानंतर स्पॉट गोल्ड १.२ टक्क्यांनी वाढून प्रति औंस २,२५८.७१ डॉलरवर आले. तर यूएस सोने फ्यूचर्स १.८ टक्क्यांनी वाढून २,२७९.१० डॉलरवर गेले.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT