नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या मदतीने राज्यसेभत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. (Rajyasabha)
गुलाम नबी आझाद हे राज्यसभेमध्ये पहिले विरोधी पक्षांचे नेते राहिले आहेत. मागील वर्षी त्यांचा कार्यकाल समाप्त झाला होता. सध्या आझाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. काॅंग्रेसमध्ये परिवर्तन व्हावं, असं मत मांडणाऱ्या जी-२३ नेत्यांमध्ये त्याचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा काॅंग्रेस पक्ष त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य पद देण्याची शक्यता आहे.
एक वृत्तपत्राशी मुलाखत देताना आझाद म्हणाले की, "मी शरद पवार यांना वरचेवर भेटत राहतो. खरंतर माझ्या अनेक राजकीय सहकाऱ्यांची भेटतो. ४० वर्षांहून अधिक काळ शरद पवार आणि मी दोघांनी एकत्रितपणे काम केलेले आहे. काॅंग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये आम्ही दोघे सोबत होतो. तसेच पी. व्ही. नरसिंह राव आणि युपीए सरकारच्या मंत्रिमंडळातही आम्ही दोघे सोबत होतो. इतकंच नाही तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष दोघेही चुलत भाऊ आहेत. त्यांना भेटायला जाणं मला आवडतं आणि ही भेट एक शिष्टाचारी भेट होती." (Rajyasabha)
दोघांची ही भेट खूप महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण, नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या दारूण पराभवाने काॅंग्रेस नेतृत्वाला धक्के बसले आहेत. काॅंग्रेस पक्षांतर्गत परिवर्तन यावं, अशी इच्छा बाळगणाऱ्या काॅंग्रेस नेत्यांच्या जी-२३ समुहाने सर्वसमावेशी काॅंग्रेस नेतृत्व असावं, असे मत मांडले आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीच्या राष्ट्रवादी कार्यालयात युवा शाखेने शरद पवार हेच युपीएचे प्रमुख व्हावेत, अशी मागणी केलेली होती.