Latest

युपी पोलीस ‘अब तक १८४’! गँगस्‍टर अनिल दुजानाचे एन्काउंटर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमध्‍ये गँगस्‍टर एन्काउंटर सत्र सुरुच आहे. कुख्‍यात गँगस्‍टर अनिल दुजाना उर्फ ​​अनिल नागर हा आज चकमकीत ठार झाला. (Gangster Anil Dujana )उत्तर प्रदेश पोलिसांच्‍या 'एसटीएफ'ने मेरठमध्‍ये धडक कारवाई केली. दुजानाविरुद्ध नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्हे दाखल होते. दरम्‍यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्‍या एसटीएफ या विशेष शाखेने मागील सहा वर्षांमध्‍ये एकूण १८४ एन्‍काउंटर केले आहेत.

Gangster Anil Dujana १० जूनलाच जामिनावर सुटला होता…

गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी दुजाना आणि त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली होती. दुजाना हा गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी आहे. 2011 मध्ये साहिबााबादमध्ये एका लग्न समारंभात त्याच्या टोळीने गोळीबार केला होता. यामध्‍ये तीन जण ठार झाले होते. अनिल दुजाना हा १० एप्रिल रोजी जामिनावर सुटला होता. तो गुन्‍हा मोठ्या गुन्‍ह्याच्‍या तयारीत असल्‍याची माहिती 'एसटीएफ' अधिकार्‍यांना मिळाली होती. दिल्ली आणि यूपीचे पोलीस त्याचा शोध घेत होते. तो मेरठमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दुजानावर १८ खून, ६२ गंभीर गुन्‍हे दाखल

अनिल दुजानी हा नोएडातील बदलपूरचा रहिवासी. एका खून प्रकरणी तो मागील तीन वर्ष अयोध्‍यातील कारागृहात बंद होता. १० एप्रिल रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून तो फरार होता. २००२ मध्‍ये त्‍याच्‍यावर गाझियाबादमध्ये खुनाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. दुजानावर 18 खुनासह 62 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो टोळी तयार करून खून, दरोडे घालत असे. उत्तर प्रदेश राज्‍यातील पश्‍चिम भागासह दिल्ली, राजस्थान, हरियाणामध्ये दुजानाची दहशत होती. 2011 मध्ये नोएडातील एका प्रकरणात त्याला 3 वर्षांची शिक्षा झाली होती. त्याच्यावर बुलंदशहर पोलिसांनी २५ हजारांचे तर नोएडा पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस ठेवले होते. जुन्या खटल्यात हजर न राहिल्याने न्यायालयाने दुजानाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

मागील आठवड्यातच दोन गुन्‍हे दाखल

जामिनावर सुटताच दुजानाने पत्नी संगीता आणि जयचंद प्रधान हत्या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावले होते. पोलिसांनी मागील आठवड्यात त्याच्यावर 2 गुन्हे दाखल केले होते. अनिल दुजानाच्या अटकेसाठी नोएडा पोलीस आणि यूपी एसटीएफ सतत छापेमारी करत होते. गेल्या दिवसांत ७ पथकांनी 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.

पोलिस बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये दुजानाला न्‍यायालयात घेऊन जायचे

दुजाना टोळीचा माफिया सुंदर भाटी टोळीशी वैमनस्‍य होते. यातून अनेक हत्या झाल्या आहेत. २०१२ मध्‍ये दुजाना आणि त्याच्या टोळीने सुंदर भाटी आणि त्याच्या जवळच्या साथीदारांवर एके-47 रायफलने हल्ला केला. सरकारी ठेके, स्टील बारची चोरी, टोल कॉन्ट्रॅक्ट यावरून या दोन्‍ही टोळ्यामध्‍ये अनेकवेळा हल्‍ले झाले आहेत. यामुळेच पोलिस दुजानाला कोर्टात घेऊन जाताना त्‍याला बुलेटप्रूफ जॅकेट देत असत.

दोन आठवड्यांपूर्वीच माफिया अतीकच्‍या मुलाचा झाला होता एन्काउंटर

उत्तर प्रदेशमधील माफिया आणि उमेश पाल हत्‍या प्रकरणातील आरोपी अतीक अहमद याचा मुलगा असद आणि गुलाम मोहम्‍मद हे दोघे १३ एप्रिल २०२३ रोजी पोलिस चकमकीत मारले गेले होते. या दोघांवर प्रत्‍येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.

प्रयागराज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेश पाल यांची हत्‍या झाली होती. तेव्‍हापासून असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे फरार होते. उत्तर प्रदेश पोलिसाचे विशेष कृती दल ( एसटीएफ ) या दोघांच्‍या मागावर होती. पथकाला दोघेही झाशी येथे असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती.  पोलिसांनी त्‍यानुसार सापळा लावला. पोलिसांनी दोघांना शरण येण्‍याचे आवाहन केले. यावेळी दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात दोघेही ठार झाले होते. या कारवाईने उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी खळबळ माजली होती. यानंतर आता गँगस्‍टर अनिल दुजाना हा चकमकीत ठार झाल्‍याने उत्तर प्रदेशमधील माफियाराजला मोठा हादरा बसला आहे.

 ६ वर्षात युपी 'एसटीएफ' कडून १८४ एन्‍काउंटर

उत्तर प्रदेशमध्‍ये याेगी आदित्‍यनाथ सरकारने राज्‍यातील माफियांवर  धडक कारवाईचे आदेश पाेलिसांना दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्‍या एसटीएफ या विशेष शाखेने मागील सहा वर्षांमध्‍ये एकूण १८४ एन्‍काउंटर केले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT