Latest

कल्याणात शिवसेना बंडखोरीवरील देखावा जप्त, शिवसेनेची हायकोर्टात धाव

दीपक दि. भांदिगरे

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा; कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग परिसरात विजय तरुण गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात शिवसेनेत दोन गट पडून जो सत्तासंघर्ष निर्माण झाला; त्या बंडखोरीवरील चलतचित्र देखावा तयार केला होता. या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. या देखाव्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली. विशेष म्हणजे गणरायांची मूर्ती स्थानापन्न होण्याआधीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घडामोडीनंतर शुक्रवारी माजी आमदार तथा भिवंडी जिल्हाप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला.

कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण- डोंबिवली महानगरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी राहतात. ते विजय तरुण मंडळाचे विश्वस्त आहेत. विशेष म्हणजे मंडळाच्यावतीने दरवर्षी वर्षातील एखाद्या महत्वाच्या चालू घडामोडीवर देखावा गणपतीसमोर साकारला जातो. यंदाच्या वर्षात सत्तासंघर्ष होऊन शिवसेनेत उभी फूट पडल्याचा देखावा साकारण्यात आला होता. ही बाब कळताच पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी अनेक भाविकांसह नागरिकही गणेशाच्या दर्शनाबरोबर तेथील सजावट वजा देखावा पाहण्यासाठी येतील. मात्र आक्षेपार्ह देखावा असल्याने तेथे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी हा देखावा जप्त करून पोलीस ठाण्यात नेला.

या संदर्भात शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख तथा मंडळाचे विश्वस्त विजय उर्फ बंड्या साळवी यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, वास्तविक पाहता देखाव्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते. मात्र तरीही पोलिसांनी पहाटेच्या सुमारास घाईघाईने येऊन कारवाई केली. ही तर हिटलरशाही आहे, हुकूमशाही आहे, आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार तर आहोतच, शिवाय या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही श्रींच्या मंडपात गणेशमूर्तीची स्थापना करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसी कारवाईच्या या घटनेनंतर एकीकडे कल्याणकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कल्याणातील शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेला 24 तास उलटत नाही तोच शुक्रवारी या संदर्भात शिवसेनेचे माजी आमदार तथा भिवंडी जिल्हाप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी पक्षनिष्ठा देखाव्यावर कारवाई केल्याने राज्य सरकार विरोधात निषेध नोंदवला. यापुढे राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून पोलिस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असतील तर भविष्यात शिवसेनेकडून मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. एकीकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिकाही दाखल केली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ नेते बाळ हरदास, शरद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या या कारवाई विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार असल्याचे महानगरप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले.

महाआरती करत निषेध

एकीकडे विजय तरुण मंडळाच्या शिवसेनेच्या बंडखोरीवर साकारण्यात आलेला देखाव्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ गुरूवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या मंडपात महाआरती करत निषेध नोंदवला. तर दुसरीकडे निषेधाचे फलक लावल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक व बाजारपेठ पोलिस ठाण्यात शहरप्रमुख सचिन बासरे आणि महानगरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT