Latest

गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण

अविनाश सुतार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : विविध प्रकारच्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या दोन जहाल नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (वय २६) व रोशनी उर्फ इरपे नरंगो पल्लो (वय ३०) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत.

अनिल कुजूर हा एटापल्ली तालुक्यातील जवेली, तर रोशनी पल्लो ही छत्तीसगड राज्यातील डांडीमरका येथील रहिवासी आहे. अनिलवर ४ लाख रुपयांचे, तर रोशनीवर २ लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. अनिल कुजूर हा २००९ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला. २०१२ पर्यंत तो कसनसूर दलममध्ये होता. त्यानंतर आजतागायत तो घरी राहून नक्षल्यांची कामे करत होता. २०११ मध्ये खोब्रामेंढा, न्याहाकल आणि छोटा झेलिया इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये तो सहभागी होता.

रोशनी पल्लो ही २००९ मध्ये छत्तीसगडमधील जटपूर दलममध्ये सहभागी झाली. त्यानंतर २०१५ पर्यंत ती तांत्रिक दलममध्ये कार्यरत होती. पुढे ती घरी राहूनच नक्षल्यांची कामे करायची. २०१५ मध्ये कुंदला आणि गुंडूरपारा जंगलातील चकमकी आणि २०१७ मध्ये दुरवडा जंगलात झालेल्या चकमकीत ती सहभागी होती. शिवाय २०१५ मध्ये भामरागड तालुक्यात तीन जणांची हत्या करण्यातही रोशनीचा सहभाग होता.

त्यांनी आत्मसमर्पण केल्याने दोघांनाही पुनर्वसनाकरिता प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. २०१९ पासून आतापर्यंत ५१ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी केले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT