Latest

G20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी-ज्‍यो बायडेन द्विपक्षीय बैठक ८ सप्टेंबरला

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष ज्यो बायडेन पुढील आठवड्यात ७ सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या जी-२० परिषदेमधील ( G20 Summit) सहभागापूर्वी राष्ट्रपती बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे.

अमेरिकेतर्फे याबाबतची औपचारिक घोषणा झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनीही द्विपक्षीय बैठकीच्या वेळापत्रकाला दुजोरा दिला. ७ सप्टेंबरला भारतात आगमनानंतर राष्ट्रपती बायडेन दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हाताळणाऱ्या अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसेसचे पथक या दौऱ्याच्या तीन दिवसांपूर्वीच भारतात पोहोचणार असून राष्ट्रपती बायडेन ३०० कमांडोच्या सुरक्षा कवचात असतील.

द्विपक्षीय बैठकीदरम्यान राष्ट्रपती बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये विविध क्षेत्रातील विशेषतः सामरिक आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्याबरोबरच वैश्विक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बातचित होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये जागतिक बॅंकेसहीत अन्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थसहाय्य करणाऱ्या बॅंकांची क्षमता वाढविण्याचाही समावेश आहे. जी-२० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन प्रशंसा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. वाढत्या चिनी वर्चस्वाला पायबंद घालण्यासाठी भारताशी जवळीक वाढविण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न असल्याने अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा जी-२०च्या निमित्ताने होणारा भारत दौरा देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

G20 Summit : चीनी राष्ट्रपतींबद्दल संभ्रम कायम

जी-२० परिषदेमध्ये चीनी राष्ट्रपतींच्या सहभागाबद्दलची संदिग्धता कायम आहे. राष्ट्रपती जिनपिंग जी-२० साठी भारत दौऱ्यावर जाणार नसल्याचा दावा परदेशी माध्यमांनी केल्यानंतर चीनी सरकारने या बातम्यांचे खंडन न करता अधिक भाष्य करण्याचे टाळले आहे. त्यांच्या दौऱ्याबाबत चीनी सरकारकडून औपचारिक खुलासा आला नसल्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जी-२० शिखर परिषदेत राष्ट्रपती जिनपिंग यांच्याऐवजी पंतप्रधान लि कियांग हे चीनचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT