नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: नवी दिल्ली संयुक्त जाहिरनामा एकमताने संमत केल्याच्या यशानंतर भारतातील महत्त्वाकांक्षी जी–२० परिषदेची आज सांगता झाली. जी–२० परिषदेचे पुढील अध्यक्षपद ब्राझील भूषवणार असून, मावळते अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपदाचे प्रतिक असलेला वॉवेल सुपूर्द केला. यावेळी, भूक आणि दारिद्र्य याविरुद्ध संघर्षाला ब्राझीलचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन लुला दा सिल्वा यांनी केले. तर, "स्वस्ति अस्तु विश्वस्य" या विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना करणाऱ्या संस्कृत वचनाने परिषदेचा समारोप झाला. (G-20 Summit)
जी–२० परिषदेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस होता. नियोजनाप्रमाणे आज वन फ्यूचर (एक भविष्य) या विषयावर सत्र झाले. याआधीची वन अर्थ (एक पृथ्वी) आणि वन फॅमिली (एक कुटूंब) या विषयांवरील दोन सत्रे काल झाली होती. आफ्रिकी समुहाला जी–२० चे मिळालेले सदस्यत्व आणि नवी दिल्ली संयुक्त जाहिरनामा देखील जागतिक पातळीवरील सर्व नेत्यांनी एकमताने स्विकारणे ही पहिल्या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "सर्वांची सोबत आणि सर्वांचा विकास" या मूलमंत्राने पुढे जाण्याचे आवाहन केले होते. (G-20 Summit)
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि अन्य राष्ट्रप्रमुखांनी आज राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आदरांजली अर्पण केली. त्यानंतर समारोप सत्र झाले. (G-20 Summit)
समारोप सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी–२० च्या पुढील अध्यक्षपद तांत्रिक स्वरुपात ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडे हस्तांतरीत केले. अर्थात, ब्राझीलच्या अध्यक्षीय जबाबदारीला १ डिसेंबर २०२३ पासून सुरवात होणार आहे. तोपर्यंत जी–२० चे अध्यक्षपद भारताकडेच राहणार आहे. या अखेरच्या अडिच महिन्यांच्या कालावधीत जी–२० चे आभासी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की नोव्हेंबर अखेरपर्यंत जी–२०च्या अध्यक्षपदाची जबबाबदारी भारताकडे आहे. दोन दिवस चाललेल्या परिषदेमध्ये अनेक सुचना आणि प्रस्ताव समोर आले. त्यामुळे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रक्रिया गतीमान कशी होईल हे पहायला हवे. यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस जी–२० शिखर परिषदेचे एक आभासी सत्र बोलावून याबाबतचा आढावा घेतला जावा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली. तसेच "स्वस्ति अस्तु विश्वस्य" या विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना करणाऱ्या संस्कृत वचनाने परिषदेचा समारोप केला.
अध्यक्षपद स्विकारल्यानंतर राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा प्राधान्यक्रम सांगितला. भूक आणि दारिद्र्य याविरुद्ध वैश्विक आघाडी तयार करणे त्याचप्रमाणे पर्यावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणणे यासाठी दोन कृती गट तयार करण्यात येतील असेही ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या समाधीस्थळीच्या दर्शनाचा उल्लेख करताना ते भावूकही झाले होते. राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी आपल्या राजकीय जीवनात महात्मा गांधींच्या आदर्शांना महत्त्व दिल्याचे सांगितले. अनेक दशके कामगार चळवळीत संघर्ष करताना आपण नेहमीच अहिंसेचे पालन केले आहे. त्यामुळे महात्मा गांधींना आदरांजली वाहताना भावूक झाल्याचे ते म्हणाले.