Latest

G-20 in India : भारत-अमेरिका द्विपक्षीय भागीदारी मजबूत; जो बायडेन यांची मोदींच्या भेटीनंतर प्रतिक्रिया

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-२० परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदा भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले. ते विमानतळावरून थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गेले. यादरम्यान बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी एकत्र डिनर केला. यावेळी त्यांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. डिनरनंतर बायडेन यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. "मिस्टर पंतप्रधान, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. आज आणि संपूर्ण जी २० मध्ये आम्ही पुष्टी करू की युनायटेड स्टेट्स-भारत भागीदारी इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा अधिक मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान आहे."

जी-२० परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदा भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत द्विपक्षीय बैठक झाली. चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाची राष्ट्रपती बायडेन यांनी केलेली प्रशंसा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्याला अमेरिकेने दिलेला पाठिंबा, खुल्या आणि मुक्त भारत प्रशांत क्षेत्रात नियमाधारीत व्यवस्थेसाठी क्वाडची असलेली नितांत आवश्यकता हे उभय नेत्यांच्या चर्चेतील ठळक मुद्दे होते. दोन्हीही नेत्यांनी भारत अमेरिकेचे सामरिक, आर्थिक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणखी वृद्धींगत करण्यावर सहमती दर्शविली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ यांच्यासमवेतही द्विपक्षीय संबंधांवर स्वतंत्रपणे चर्चा केली.

जी-२० परिषदेसाठी आज सायंकाळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे दिल्लीत आगमन झाले. केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग यांनी विमानतळावर राजकीय शिष्टाचारानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. या सोपस्कारांनंतर लगेचच राष्ट्रपती बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७, लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी द्विपक्षीय बैठकीसाठी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राष्ट्रपती बायडेन यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उभय देशांचे संबंध आणखी प्रगाढ करण्याबाबत तसेच जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ५० मिनिटे सविस्तर बातचीत झाली.

या भेटीनंतर पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही नेत्यांची सार्थक चर्चा झाल्याचे ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ७ लोककल्याण मार्ग येथे बातचित केली. चर्चेत अनेक मुद्द्यांचा समावेश होता. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी प्रगाढ होतील. तर, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करून, राष्ट्रपती बायडेन यांच्या स्वागताने आनंद झाल्याचे सांगितले. ही भेट सार्थक झाली. भारत आणि अमेरिकेदरम्यान आर्थिक तसेच लोकसंपर्क आणखी दृढ करण्यावर चर्चा झाली. वैश्विक सलोख्यासाठी दोन्ही देशांची मैत्री महान भूमिका बजावेल, असेही राष्ट्रपती बायडेन यांच्या व्हाईटहाऊस कार्यालयातर्फे देखील याच आशयाचे ट्विट करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी भारत आणि अमेरिकेच्या घनिष्ठ आणि दृढ भागीदारी अधोरेखित करताना राष्ट्रपती बायडेन यांचे भारतात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जून २०२३ मध्ये झालेल्या ऐतिहासिक वॉशिंग्टन दौऱ्यामध्ये ज्या उपलब्धी साध्य केल्या त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतल्याचे व्हाईटहाऊस तर्फे स्पष्ट करण्यात आले. यानंतर या भेटीनंतर उभय देशांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या या बैठकीमध्ये जीई जेट इंजिन खरेदी, सामरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे प्रिडेटर ड्रोन यांच्या खरेदीबाबत बातचित झाली. या साहित्याच्या खरेदीची प्राथमिक चर्चा पंतप्रधान मोदींनी जून मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यामध्ये झाली होती. यासोबतच ५ जी आणि ६ जी स्पेक्ट्रम, नागरी आण्विक क्षेत्रातील प्रगती याचप्रमाणे आर्थिक सहकार्य या मुद्द्यांचाही चर्चेत समावेश होता. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनी दादागिरीला चाप लावण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशानी क्वाडची स्थापना केली आहे. भारत प्रशांत क्षेत्रातील खुलेपणासाठी क्वाडच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांची बोलणी झाली. येत्या प्रजासत्ताक दिनाला (२६ जानेवारी) क्वाड देशांच्या राष्ट्र प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे.

दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्रपती बायडेन हॉटेल आयटीसी मौर्यकडे रवाना झाले. उद्या (९ सप्टेंबर) ते जी-२० शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, उद्या सकाळी ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. भारत दौऱ्यानंतर राष्ट्रपती बायडेन व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, जी-२० परिषदेसाठी " हॅलो दिल्ली, यावर्षी जी-२० परिषदेसाठी भारतात असणे आनंददायी आहे", असे ट्विट राष्ट्रपती बायडेन यांनी केले.

भारत अमेरिका संयुक्त निवेदनातील मुद्दे

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला राष्ट्रपती बायडेन यांनी अमेरिकेचा पाठिंबा व्यक्त केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) चे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चंद्रयान- ३चे केलेले ऐतिहासिक लॅंडिंग, आदित्य या भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण यासाठी राष्ट्रपती बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे तसेच इस्त्रोचे अभिनंदन केले. यासोतच बाह्य अवकाश संशोधनामध्ये भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठीची उभय देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. तसेच मायक्रोचिप तंत्रज्ञानावर भारतात संशोधन आणि विकासासाठी ३०० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीवर आणि भारतात संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी कार्याचा विस्तार करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये भारतात ४०० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीच्या घोषणांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनीसमाधान व्यक्त केले.

भारतात जीई एफ-४१४ जेट इंजिन तयार करण्यासाठी जीईजीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) यांच्यात करारासाठी वाटाघाटी सुरू झाल्याचेही या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. तर, भारताने अमेरिकेकडून ३१ जनरल अॅटॉमिक्स एमक्यू – ९ बी (१६ स्काय गार्डियन आणि १५ सी गार्डियन) ड्रोन आणि त्यांच्याशी संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी विनंती पत्र जारी केले आहे. याचेही राष्ट्रपती बायडेन यांनी स्वागत केले. यामुळे चीनी सीमेवर आणि हिंद महासागरात पाळत ठेवण्याची तसेच मारा करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.

बांगलादेश, मॉरिशसशी बातचित

दरम्यान, राष्ट्रपती बायडेन यांच्यासमवेत झालेल्या द्विपक्षीय बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यामवेत चर्चा झाली. जी-२० परिषदेसाठी विशेष अतिथी म्हणून बांगलादेशला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी राजकीय आणि सुरक्षा सहकार्य, सीमा व्यवस्थापन, व्यापार आणि संपर्क, जलसंपदा, ऊर्जा, विकास सहकार्य, सांस्कृतिक संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्याबाबत चर्चा केली. प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवरही उभय नेत्यांची बातचित झाली.

चट्टोग्राम आणि मोंगला बंदरांचा वापर आणि भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईनच्या कार्यान्वित करण्याच्या कराराचे या बैठकीत दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्यासमवेत देखील पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या हिरक महोत्सवी वर्षात जी- २० परिषद होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान जुगनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT