Latest

G20 summit in india : पंतप्रधान मोदी- ऋषी सुनक यांच्यात मुक्त व्यापार करारावर द्विपक्षीय चर्चा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या (G20 summit in india)  पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. ९) ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार (FTA) यावर चर्चा केली.

या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकून सांगितले की, दोन्ही देशांमध्ये व्यापार संबंध अधिक घट्ट करण्याच्या आणि गुंतवणूक वाढविण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. भारत आणि यूके एक समृद्ध आणि शाश्वत विकासासाठी काम करत राहतील. (G20 summit in india)

शुक्रवारी जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात दाखल झालेले पंतप्रधान सुनक यांचे पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमस्थळी स्वागत केले. यावेळी दोघांमध्ये हलक्याफुलक्या गप्पांही रंगल्या होत्या.

सुनक यांनी सांगितले की, भारतासोबत मुक्त व्यापार करार पूर्ण होण्यासाठी अजूनही काही काम बाकी आहे. परंतु, तो अंतिम करार दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरेल आणि 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याच्या सामायिक उद्दिष्टाला चालना मिळेल. मोदीजी आणि मी आमच्या दोन्ही देशांमध्ये एक व्यापक आणि महत्वाकांक्षी व्यापार करार पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी आम्ही मोठी प्रगती केली असली, तरी अजूनही कठोर परिश्रम करायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारत दौऱ्याबद्दल बोलताना सुनक म्हणाले की, मी माझ्या भारतीय मुळ आणि भारतातील माझ्या नातेसंबंधांबद्दल खूप अभिमान बाळगतो. माझी पत्नी भारतीय आहे. आणि मी एक हिंदू आहे, याचा अर्थ मी नेहमीच भारत आणि भारतीय लोकांशी जोडला गेलो आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT