Latest

‘पहिलं पाऊल’ निराशेचं? गणवेश खरेदीचे 9 कोटी बँकेत अडकले

अमृता चौगुले

गोरक्षनाथ शेजूळ

नगर: नवा वर्ग, नवीन बेंच, नवीन पुस्तके अन् कपडेही नवे.. अशी आशा मनोमनी बाळगून विद्यार्थी चार दिवसांनी सोमवारी (दि.13) शाळेत पाऊल टाकणार आहेत. यातील नवा वर्ग, नवीन पुस्तके, बेंचची आस पूर्णत्वास जाईल, मात्र पहिल्याच दिवशी नवे कपडे मिळतील की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने नवीन गणवेश खरेदीसाठी बँकेत पैसे वर्ग केले पण पीएफएमएस प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या कपडे खरेदीसाठी शाळांच्या खात्यावर अजूनही पैसेच वर्ग झालेले नाहीत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'पहिले पाऊल' या स्वागत उपक्रमाचे आदेश शाळांना दिले, पण नगरसह अनेक जिल्ह्यात पहिल्या दिवशी नवीन कपडे मिळण्याच्या आशा धुसर होत असल्याचे चित्र समोर दिसत असल्याने प्राथमिक'च्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल निराशेचे पडण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

यंदाचे शैक्षणिक वर्षाची सुरूवात 13 जूनपासून होत असून जिल्हा परिषदेसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांची घंटा खणखणार आहे. पहिल्याच दिवशी 13 जूनला मुलांना मोफत गणवेश देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यासाठी लागणारा निधीही दिला आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 9 मे रोजीच पत्राव्दारे गणवेश खरेदीबाबत शाळांना सूचना दिलेल्या आहेत. त्याला आता महिना उलटला, तसेच शाळा सुरू होण्यासाठीही अवघे चार दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील एकाही शाळेला अद्याप गणवेश खरेदीसाठी पैसे मिळालेले नाहीत.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2022-23 वर्षासाठीही मोफत गणवेश योजना राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना दोन-दोन गणवेश दिले जाणार आहे. एका विद्यार्थ्याला एका गणवेशासाठी 600 रुपयांची तरतूद केलेली आहे. सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील मुलांना नवीन गणवेश दिला जाणार आहे.

गणवेश खरेदीबाबत शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची माहिती संकलित करून ती महाराष्ट्र बँकेला दिली आहे. बँकेने या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात निधी वर्ग करावयाचा आहे. शाळा सुरू होण्याला चार दिवस बाकी राहिले असताना अद्यापही जिल्ह्यातील एकाही शाळेच्या खात्यावर गणवेश खरेदीचे पैसे वर्ग झालेले नाहीत. विद्यार्थ्यांची मापे, टेंडर प्रक्रिया पाहता चार दिवसात गणवेश खरेदी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता दोन दिवसांत पैसे शाळांच्या खात्यावर वर्ग होतील असे सांगण्यात आले.

शिक्षणाधिकारी अनभिज्ञ

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गणवेश खरेदीचे पैसे शाळांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे उत्तर प्रस्तुत प्रतिनिधीला दिले. मात्र, संबंधित योजनेच्या अधिकार्‍यांनी तांत्रिक कारणाने अजूनही शाळांना पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर पाटील हे संबंधित कर्मचार्‍यांना विचारण्याचा सल्ला देतात. कर्मचारी शिक्षणाधिकारी पाटील यांच्याकडे बोट दाखवितात. शिक्षण विभागातील ही टोलवा टोलवी गणवेश खरेदीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली.

शिक्षणमंत्र्यांचा ऑनलाईन आढावा

गणवेश निधी शाळांना वेळेत पाठवा. मोफत पाठ्यपुस्तक पहिल्याच दिवशी द्या. सर्व शाळांना पहिल्या दिवशी पहिले पाऊल' हा उपक्रम राबवून नवीन मुलांचे स्वागत करावे. प्रभात फेरी काढावी अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांना ऑनलाईन बैठकी दिल्या आहेत.

शासनाकडून शिक्षण विभागाचे पैसे प्राप्त आहेत. त्याबाबतची प्रक्रियाही झाली आहे.पीएफएमएस प्रणालीद्वारे येत्या दोन दिवसात पैसे संबंधित शाळांच्या खात्यावर वर्ग होतील.
-अभिजित फळे, अधिकारी, महाराष्ट्र बँक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT