Latest

मित्रच बनला वैरी! कोल्हापुरात दारूच्या नशेत मित्राचा घोटला गळा, उच्चभ्रु वस्तीतील घटनेमुळे खळबळ

अविनाश सुतार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून  खून केल्याची घटना राजारामपुरी येथे (गल्ली क्रमांक सात) आज (दि.१२) पहाटे घडली. दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) असे खून झालेल्या तरुणाचे  नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर (वय ५४ रा. कोटणीस हाइट्स, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर) यास अटक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

  • मध्यरात्रीच्या त्यांच्या मध्ये जोरजोरात वादावादी झाली.
  • दिनेश याने संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली
  • संतप्त झालेल्या तेंडुलकर यांनी दिनेशचा पाठीमागून जोरात गळा आवळला.
  • दोन तास संशयित मृतदेहाजवळ बसून होता.

दोघे जिवलग मित्र, दारूच्या नशेत वादावादी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती दिनेश सोळांकूरकर व संशयित संगमेश तेंडुलकर हे दोघे जिवलग मित्र होते. काही वर्षांपूर्वी दिनेश हा गारगोटी येथे वास्तव्याला गेला. मात्र, अधूनमधून त्यांची भेट होत असे. दोघेही काम धंदा करत नव्हते, रिकामटेकडेच होते. दिनेश तीन दिवसांपूर्वी संशयित तेंडुलकरच्या राजारामपुरी येथील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने रात्री दोघेही मद्य प्राशन करत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांच्यामध्ये जोरजोरात वादावादी झाली.

दिनेश याने संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तेंडुलकर यांनी दिनेशला पाठीमागून मिठी मारून जोरात गळा आवळला. दिनेश मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला सोडून दिले. दोन तास संशयित मृतदेहाजवळ बसून होता. पहाटे सहा वाजता संशयिताने पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून या  घटनेची माहिती दिली.

संशयित आरोपीने दिली खुनाची कबुली

शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. राजारामपुरी येथील मध्यवस्तीत खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत दिनेश याची आई सुजाता अशोक सोळांकूरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपीने खुनाची कबुली दिली असल्याचे  तपासाधिकारी अनिल तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT