पुढारी ऑनलाईन : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने आज शुक्रवारी दिले आहे. भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. पण त्यांनी जानेवारीत नवी दिल्लीत येण्यास असमर्थता व्यक्त केली होती. यामुळे आता प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. (Emmanuel Macron)
मॅक्रॉन हे फ्रान्सचे सहावे नेते आहेत जे २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे असतील. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक हे १९७६ आणि १९९८ मध्ये दोनवेळा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपस्थित राहिले होते. माजी राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिस्कार्ड डी'एस्टिंग, निकोलस सार्कोझी आणि फ्रँकोइस ओलांदे यांनी अनुक्रमे १९८०, २००८ आणि २०१६ मध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये फ्रान्सला भेट दिली होती. ते पॅरिसमधील बॅस्टिल डे (फ्रेंच नॅशनल डे) सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. मॅक्रॉन यांनी सप्टेंबरमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांची मॅक्रॉन यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली. भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. भारताकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी परदेशी नेत्यांना आमंत्रित केले जाते. कोविड-१९ महामारीदरम्यान २०२१ आणि २०२२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले नव्हते.
हे ही वाचा :