Latest

French Open Final : राफेल नदालच लाल मातीचा बादशहा, २२ व्‍या ग्रँडस्‍लॅमवर माेहर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

फ्रेंच ओपन अंतिम सामन्‍यात नॉर्वेचा कॅस्पर रुडवर मात करत राफेल नदाल  याने आपणच लाल मातीचा बादशहा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि नॉर्वेचा कॅस्‍पर रुड यांच्‍यात फ्रेंच ओपनचा अंतिम सामना रंगला. लाल मातीवरील निर्वावाद वर्चस्‍व गाजवत नदालने 6-3,  6-3 , 6-0 असा हा सामना जिंकला

French Open Final : पहिल्‍या सेटमध्‍ये नदालच किंग

पहिल्‍या सेटमध्‍ये नदालने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. 6-3 असा पहिला सेट आपल्‍या नावावर केला.

दुसर्‍या सेटमध्‍ये रुट झूंजला; पण नदालच भारी पडला

रुटने हार न मानता दुसर्‍या सेटमध्‍ये नदाला कडवी झूंज देत सेटमध्‍ये ३-१ अशी आघाडी घेतली हाेती. मात्र नदाने आपणच 'गुरु' असल्‍याचे सिद्‍ध करत सेट ३-३ अशी बराेबरी साधली. चाैथ्‍या गेममध्‍ये नदालने रुटची  सर्व्हिस ब्रेक करत  ४-३ अशी आघाडी घेतली.  तसेच पुन्‍हा आपली सर्व्हिस कायम राखत ५-३ अशी दुसर्‍या सेटच्‍या विजयाकडे  वाटचाल केली.  पुन्‍हा रुटची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेटही  6-3 असा आपल्‍या नावावर केला.

सलग तीन सेट जिंकत नदालचे लाल मातीवर निर्वावाद वर्चस्‍व

सलग दाेन सेट जिंकल्‍यानंतर आत्‍मविश्‍वास दुणावलेल्‍या राफेल नदालने मागे वळून पाहिले नाही. तिसर्‍या सेटच्‍या पहिल्‍या गेम त्‍याने  सहज आपल्‍या नावावर केला. सलग दाेन सेट पराभूत झाल्‍याने रुटच्‍या खेळातील सातत्‍य हरवले. नदालने त्‍याच्‍या चुका हेरत आपला दमदार खेळ कायम ठेवत रुटची तिसर्‍या सेटमधील पहिलीच सर्व्हिस ब्रेक केली.   यानंतर आपली सर्व्हिस कायम राखत तिसर्‍या सेटमध्‍ये ३-० अशी निर्वावाद आघाडी घेतली. यानंतर सलग तीन गेम जिंकत तिसरा सेटही ६-0 जिंकत नदालने फ्रेंच ओपन स्‍पर्धेवर आपलं नाव काेरलं.

कॅस्‍पर  ग्रँडस्‍लॅमच्‍या फायनलमध्‍ये पोहचणारा पहिला नॉर्वेजियन खेळाडू

आठवा मानांकित २३ वर्षीय कॅस्‍पर हा ग्रँडस्‍लॅमच्‍या फायनलमध्‍ये पोहचणारा पहिला नॉर्वेजियन खेळाडू ठरला हाेता. विशेष म्‍हणजे तो राफेल नदललाच आपला गुरु मानतो. नदाल अकादमीतच तो सराव करतो. त्‍यामुळे टेनिसमधील गुरु-शिष्‍याच्‍या या सामन्‍याकडे जगभरातील टेनिसप्रेमीचे लक्ष वेधले होते.

गुरु हा गुरुच असताे…

विशेष म्‍हणजे आजपर्यंत नदाल हा फ्रेंच ओपन ग्रँडस्‍लॅममध्‍ये अंतिम सामन्‍यात पराभूत झाला नव्‍हता. म्‍हणूनच लाल मातीचा बादशहा अशी त्‍याची टेनिस जगतामध्‍ये ओळख आहे. आज त्‍याने पुन्‍हा एकदा त्‍याने ही ओळख कायम ठेवली. यंदाची ऑस्‍ट्रेलियन ओपन जिंकत नदालने २१ ग्रँडस्‍लॅम जिंकत टेनिसपटू नोव्‍हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांना मागे टाकले होते. आता फ्रेंच ओपनवर माेहर उमटवत त्‍याने  २२ वे ग्रँडस्‍लॅम आपल्‍या नावावर केले आहे.

SCROLL FOR NEXT