पुढारी ऑनलाईन : तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर आज बुधवारी सकाळी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, २५ वर्षांतील तैवानमधील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटकांचे आकर्षण असलेल्या हुलिएन शहराच्या दक्षिणेला सुमारे १८ किलोमीटरवर (११ मैल) होता. येत्या काही दिवसांत ७ तीव्रतेचे अनेक भूकंपाचे धक्के बसणार असल्याचा इशारा तैवानच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Taiwan Earthquake)
तैवानच्या राष्ट्रीय अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या आधी झालेल्या भूकंपात हुलिएन काउंटीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५७ जण जखमी झाले आहेत. स्थानिक युनायटेड डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या केंद्राजवळ तारोको नॅशनल पार्कमध्ये दरड कोसळून तीन हायकर्सचा मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी तैवानला ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर तैवानच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण-पश्चिम जपानी बेटांवर त्सुनामीच्या लाटा दिसून आल्या. पण या त्सुनामीच्या लाटांमुळे कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या केंद्रापासून दक्षिणेस सुमारे १०० किमी (६२ मैल) चेंगगाँगमध्ये अर्धा मीटर किंता १.५ फूट उंचीपर्यंत त्सुनामीच्या लाटा उसळल्या.
शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्याने हुलिएनमधील पाच मजली इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या इमारतीचा पहिला मजला कोसळला आहे. संपूर्ण इमारत ४५ अंशाच्या कोनात झुकलेली आहे. तैवानची राजधानी तैपेईमध्ये जुन्या इमारतींमधून आणि काही नवीन कार्यालयीन संकुलांतील भिंतीच्या फरशा कोसळल्या आहेत. तर काही इमारतीतून भाग कोसळला आहे. शाळांतील विद्यार्थ्यांना पिवळे सुरक्षा हेल्मेट घालून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. (Taiwan Earthquake)
२ कोटी ३० लाख लोकसंख्येच्या तैवान बेटावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. आजच्या भूकंपामुळे दुसऱ्या महायुद्धापूर्वी बांधलेल्या राष्ट्रीय विधीमंडळ इमारतीच्या भिंती आणि छताचे नुकसान झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना केवळ ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची शक्यता वाटत होती. त्यामुळे त्यांनी लोकांना अलर्ट केले नाही. पण प्रत्यक्षात शक्तीशाली भूकंप झाला.
एपीच्या वृत्तानुसार, "भूकंप ही एक सामान्य घटना आहे आणि मला त्यांची सवय झाली आहे. पण आज पहिल्यांदाच भूकंपामुळे मला भीती वाटली." असे तैपेईचे रहिवासी सिएन-ह्स्युएन केंग यांनी सांगितले. "मी भूकंपाच्या धक्क्याने जागा झालो. इतका तीव्र थरकाप मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता." असेही ते पुढे म्हणाले.
हुलिएनला २०१८ मध्ये एका जीवघेण्या भूकंपाचा धक्का बसला होता. ज्यामुळे एक ऐतिहासिक हॉटेल आणि इतर इमारती कोसळल्या होत्या. तैवानमध्ये अलिकडच्या वर्षांत सर्वात मोठा भूकंप २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल होती. यात २,४०० लोकांचा मृत्यू आणि सुमारे १ लाख लोक जखमी झाले होते आणि हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या.
हे ही वाचा :