पुणे : पुढारी वृत्तसेवा
दिवसेंदिवस शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाचा गुंता वाढताना दिसतो आहे. 2019-20 मधील टीईटीचा गैरव्यवहार समोर आल्यानंतर सायबर पोलिसांनी आता 2018 मध्ये झालेल्या टीईटीतील गैरव्यवहाराच्या तपासाला सुरुवात केली आहे.
2018 मध्ये झालेल्या परीक्षेतील काही उमेदवार अपात्र असताना 2019-20 च्या परीक्षेत पात्र झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या परीक्षेत पैसे देऊन पात्र झालेल्या उमेदवारांची छाननी करण्यात आली आहे. या वर्षीच्या परीक्षेत अपात्र असताना पात्र केलेल्या उमेदवारांचा आकडा कमी असण्याची शक्यता आहे. तरीही हा आकडा तीन हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्याची सध्या पडताळणी सुरू आहे.
2018 मध्ये घेतलेल्या पात्रता परीक्षेतील काही उमेदवारांना पात्र करण्यासाठी त्यांची नावे 2019-20 मध्ये घुसविल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे 2019 मध्ये पात्र उमेदवारांचा आकडा वाढला आहे. पात्र करण्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून 50 हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत रक्कम घेतली होती. 2018 च्या टीईटीमध्ये अपात्र असताना पात्र झालेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणात हरकळ बंधूंना उमेदवार व पैसे मिळवून देणार्या एजंटच्या अटकेचे सत्र सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत खासगी एजंट, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, परीक्षेचे कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीचे पदाधिकारी ते थेट प्रशासकीय सेवेतील आयएस अधिकार्याला अटक करण्यात आली. टीईटी 2019-20 मध्ये सात हजार 880 उमेदवार अपात्र असताना पात्र केल्याचे आढळून आले होते.