Latest

Heath Streak Passes Away : दिग्गज क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे दीर्घ आजाराने निधन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Heath Streak Passes Away : झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पत्नीने फेसबुकवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. याआधी 23 ऑगस्टला स्ट्रीक यांच्या मृत्यूची बातमी आली होती पण नंतर ती अफवा असल्याचे समजले होते. मात्र, यावेळी त्यांच्या पत्नीने फेसबुकवर पोस्ट करत हीथ स्ट्रीक (Heath Streak) यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे जाहीर केले आहे.

नदिनी स्ट्रीक यांची भावनिक पोस्ट (Heath Streak Passes Away)

नदिनी स्ट्रीक यांनी पती हिथ यांच्या निधनाबद्दल फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्या लिहितात, 'रविवारी, 3 सप्टेंबर रोजी पहाटे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले. त्यांना आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत व्यतीत करायचे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू', अशी भावना व्यक्त करत दिवंगत क्रिकेटपटूला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्ट्रीक यांची वनडे क्रिकेट कारकीर्द कशी होती?

स्ट्रीक यांनी वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी एकूण 189 सामने खेळले आणि 185 डावांमध्ये 29.82 च्या सरासरीने आणि 4.51 च्या इकॉनॉमीने एकूण 239 विकेट्स घेतल्या. वनडे सामन्यात त्यांनी एकदा 5 विकेट्स घेतल्या. त्यांची सर्वोत्तम कामगिरी 32 धावांत 5 विकेट्स अशी होती. त्याचप्रमाणे स्ट्रीकने वनडे सामन्यांच्या 159 डावांमध्ये 28.29 च्या सरासरीने 2,943 धावा केल्या. या काळात त्यांच्या बॅटमधून 13 अर्धशतकेही झळकली. (Heath Streak Passes Away)

स्ट्रीक यांची कसोटी क्रिकेट कारकीर्द कशी राहिली?

स्ट्रीक यांनी झिम्बाब्वेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 65 सामने खेळले आणि 102 डावात 28.14 च्या सरासरीने आणि 2.69 च्या इकॉनॉमीने एकूण 216 विकेट घेतल्या. त्यांनी 7 वेळा 5 विकेट्सही घेतल्या. 73 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याचप्रमाणे कसोटीच्या 107 डावांमध्ये 22.35 च्या सरासरीने 1,990 धावा केल्या. यादरम्यान स्ट्रीक यांनी 11 अर्धशतके आणि 1 शतक (127*) झळकावले.

वयाच्या 31 व्या घेतली निवृत्ती

  • स्ट्रीक यांनी 10 नोव्हेंबर 1993 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले.
  • 31 ऑगस्ट 2005 रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला.
  • 1 डिसेंबर 1993 रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
  • शेवटची कसोटी 20 सप्टेंबर 2005 रोजी भारताविरुद्ध खेळली.
  • झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाशी झालेल्या वादामुळे स्ट्रीक यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडू

स्ट्रीक यांचा कसोटीत 1000 धावा आणि 100 विकेट्सच्या खास क्लबमध्ये त्याचा समावेश होता. याशिवाय, ते वनडे क्रिकेटमध्ये 2,000 धावा आणि 200 बळींच्या विशेष क्लबमध्येही नंबर पटकावला होता.

स्ट्रीकचा आयपीएलशीही संबंध (Heath Streak Passes Away)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्ट्रीक प्रशिक्षक म्हणून नव्या भूमिकेत दिसले. बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघाचे ते प्रशिक्षक होते. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या प्रशिक्षक संघाचा एक भाग होते. याशिवाय तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे (केकेआर) प्रशिक्षक होते. त्यांनी काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेट क्लबचे प्रशिक्षक म्हणूक काम पाहिले.

आयसीसीने घातली होती बंदी

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC)ने 2021 मध्ये स्ट्रीकवर भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 8 वर्षांची बंदी घातली होती. तथापि, त्यानंतर स्ट्रीकने एक निवेदन जारी करून आपल्यावरील आरोपाचे खंडन केले होते. 'मी कोणत्याही मॅच-फिक्सिंग, स्पॉट-फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हतो. सामन्यादरम्यान कोणत्याही वेळी खेळ किंवा आमच्या रणनितीची माहिती शेअर केली नव्हती', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT