Latest

जुन्या-पुरान्या साड्या वाटून आमच्या आया-बहिणींची अब्रू काढता : माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जुन्या आणि पारदर्शक साड्या वाटून आमच्या आया बहिणींचा अपमान केला गेला आहे. याची किंमत त्यांना येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल, असा इशारा आज माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे. केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांबाबत सापत्न वागते आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक सध्या केवळ निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपात गुंतले आहेत. या निवडणुकीत रोजगार, शेतीमालाचा भाव, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यावरच चर्चा झाली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

धुळ्यातील कल्याण भवनातील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी लोकसंग्राम पक्षाचे तेजस गोटे, प्रशांत भदाणे, विजय वाघ आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या साडीवाटप कार्यक्रमावर कठोर शब्दात टीका केली आहे. या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या फाटक्या आणि ठिगळ लावण्याचा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

केंद्रातील भाजप सरकारने, 'गरीब कुटूंब प्रमुख त्याच्या परिवारातील महिलांना एक साडी सुध्दा घेवू शकत नाही. असे दाखवण्याचे काम करून गरीबीची चेष्टा केली आहे. यासाठी रेशन दुकानातून वाटप केलेल्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच, फाटक्या थिगळ लावलेल्या जुन्या-पुरान्या आहेत. एवढेच नव्हे तर, अत्यंत पारदर्शक असून आरपार दर्शक आहेत. अशा साड्या म्हणजे, आमच्या आया-बहिणींची अब्रू चव्हाट्यावर टांगल्या सारखे आहे. वाटपासाठी आणलेल्या साड्या एवढ्या चांगल्या दर्जाच्या आहेत. असा दावा आजपर्यंत एकाही भाजपा नेत्याने केलेला नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, सदर पारदर्शक साड्या वाटून दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या आदिवासी, दलित तसेच गरीबांच्या अब्रूचे सार्वजनिक धिडंवंडे काढण्याचा प्रकार आहे'. अशी अत्यंत विखारी टिका करून लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे.

'भाजपाच्या देशातल्या सर्वोच्च नेत्यापासून सर्वांना माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की, गरीबांना वाटलेल्या या साड्या नेसून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या भाजपा महिलांना आमच्या ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा. याचा भाजपाला दुहेरी फायदा होईल. साड्यांचा आपोआप प्रचार होईल. साड्यांवर होणारी टिका आपोआप बंद होईल. भारतीय जनता पक्षाचा एक हितचिंतक म्हणून माझी विनंती मान्य करावी, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले आहे. आम्ही गरीब आहोत, याचा अर्थ भाजपमधील प्रतिष्ठीत उच्चवर्णीय नेत्यांनी आम्हांला लाचार आणि भिकारी समजण्याचे काही कारण नाही. आम्ही आमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी पुरेसे सक्षम आहोत. हे तुम्हाला येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देवू , असा इशारा यावेळी गोटे यांनी दिला.

मोफत धान्य वाटपावर टीका

देशातील सत्तारूढ भाजप व त्यांचे नेते आम्ही ८० कोटी लोकांना फुकट खाऊ घालतो, असा देशभर डांगोरा पिटत आहेत. तर दिल्लीच्या सत्तेतील भाजप नेते, ५ किलो तांदूळ व ३ किलो गहू ज्याची शासकीय किंमत केवळ ९० रूपये होते, ते दरमहिन्याला विनामूल्य देण्याचे श्रेय लाटत आहेत. त्याचवेळेला देशाच्या धान्य कोठारात क्षणाक्षणाला भर टाकून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून, घाम गाळून स्वंयपूर्ण केले. शेतकऱ्याला शेती परवडू नये, अशी व्यवस्था केंदातील सत्ताधारी अंमलात आणीत आहेत. शेतकरी लवकरात लवकर भूमीहीन होवून शेतकरी स्वतःच्याच शेतात शेतमजूर झाला पाहिजे, सरकारच्या फुकट धान्य योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे, या कार्यक्रमाची बेमालूमपणे अंमलबजावणी करीत आहेत.

देशातील 47 टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्याच सभेत 80 कोटी जनतेला धान्य देतो, असे ते सांगतात. मग दारिद्र्यरेषेमधून वर आलेले लोक कोण आहेत, असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला.

सरकारचे शेतकरी विरोधी धोरण

पंतप्रधान सन्मान योजनेखाली गरीब शेतमजूरांना सहा हजार रूपये वर्षाला त्याच्या खात्यात जमा केले जातात. याचा अर्थ दररोज १६ रूपये ४४ पैसे सन्मान वेतन म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. दारूच्या दुकानापुढे बसणारा भिकारी सुध्दा या पेक्षा जास्त कमवतो. भीक मागूनही जास्त पैसे मिळतात. मग यात कसला आला सन्मान ? असा प्रश्न उपस्थित करून गोटे यांनी म्हटले आहे की, '२०१४ मध्ये सोयाबीन ४ हजार रूपये होते, आज ३.५०० रूपये आहे. कापूस ८ हजार रूपये होता. आज ७.८०० रूपये आहे. दुबई मध्ये कांदा २९० रूपये किलो आहे. पण निर्यातदार शेतकऱ्यांना फक्त ४० रूपये मिळतात. परदेशातून पिवळे वाटाणे, तूर आयात करून हरभऱ्याचे भाव पाडले. शेतकऱ्यांना टमाटाचे बरे भाव मिळाले तर, दहा लाख टन टमाटे नेपाळ मधून आयात केले. शत्रू राष्ट्रातील शेतकरी श्रीमंत करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. यात कोणते देशप्रेम आहे असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT