Latest

पतीला भित्रा आणि बेरोजगार म्‍हणणे, त्‍याला आई-वडिलांपासून वेगळे होण्‍यास भाग पाडणे ही क्रूरता : कोलकाता उच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पत्‍नीने पतीला आई-वडिलांपासून वेगळे होण्‍यास भाग पाडणे त्‍याला भित्रा आणि बेरोजगार म्‍हणणे मानसिक क्रूरता आहे. या क्रूरतेचा सामना करणार्‍या पतीला घटस्‍फोट मंजूर केला जाऊ शकतो, असे कोलकात्ता उच्‍च न्‍यायालयाने नुकत्‍याच घटस्‍फोट प्रकरणी दाखल याचिकेवरील निकालावेळी स्‍पष्‍ट केले. ( Divorce case )

पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर कौटुंबिक न्यायालयाने पत्‍नीकडून होणार्‍या मानसिक छळाच्‍या आधारे २ जुलै २००१ रोजी पतीला घटस्‍फोट मंजूर केला होता. या निकालाविरोधात पत्‍नीने कोलकाता उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सौमेन सेन आणि उदय कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनवणी सुरु होती.

मुलाने लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहणे ही सामान्य प्रथा

कौटुंबिक न्‍यायालयाचा निकाल कायम ठेवताना न्यायमूर्ती सौमेन सेन आणि उदय कुमार यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, पतीने आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहावे अशी संबंधित पत्‍नीची इच्‍छा होती. भारतीय कुटुंबातील मुलाने लग्नानंतरही आपल्या आईवडिलांसोबत राहणे ही एक सामान्य प्रथा आहे. आपल्‍या संस्कृतीमध्‍ये आई-वडिलांना सांभाळणे हे मुलाचे धार्मिक कर्तव्य मानले जाते. पत्नीने मुलाला समाजातील प्रचलित प्रथेपासून वेगळा निर्णय घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यास सांगणे यासाठी ठोस कारण असणे आवश्‍यक आहे."

पत्‍नीच्‍या डायरीतील मजकूरची न्‍यायालयाने घेतली दखल

पत्‍नीने तिच्या वैयक्तिक डायरीमध्ये पतीविषयी नमूद केलेल्‍या मताची या वेळी उच्‍च न्‍यायालयाने दखल घेतली. पत्‍नीने डायरीत नमूद केले होते की, 'मी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो भित्रा आहे. त्‍याचा मला तिरस्कार आहे. बेरोजगार व्यक्तीशी लग्न करण्यास माझी संमती नव्हती. मात्र आई-वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावले'.

खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की,  डायरीतील मजकुरावरुन संबंधित पत्‍नीला दुसरीकडे लग्न करायचे होते. ती तिच्या लग्नावर खूश नव्हती. तरीही पतीने तिच्याशी जुळवून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला,"

 Divorce case : पतीला पत्‍नीने भित्रा आणि बेरोजगार म्‍हणणे ही मानसिक क्रूरता

भारतातील मुलाने पत्नीच्या सांगण्यावरून आपल्‍या आई-वडिलांपासून विभक्त होणे ही सामान्य प्रथा नाही. या प्रकरणामध्‍ये पत्‍नीला तिच्‍या सासु-सासर्‍यांपासून वेगळे राहण्‍यासाठी क्षुल्लक घरगुती समस्या होत्‍या. ठोस असे कारण नव्हते. अखेर पती केवळ त्याच्या विवाह टिकावा म्‍हणून पालकांच्‍या घरातून भाड्याच्या घरात  पत्‍नीसोबत राहण्‍यास गेला होता. या प्रकरणात पत्‍नीला तिच्या पतीसोबत सासरपासून वेगळे राहण्याची इच्छा न्याय्य कारणांवर आधारित नाही. तसेच पत्‍नीने पतीला भित्रा आणि बेरोजगार म्‍हणणे ही मानसिक क्रूरता आहे, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

अशा प्रकरणांमध्‍ये विवाहाचे पावित्र्य राखले जात नाही

पती-पत्‍नीने दीर्घकाळ वेगळे राहणे, मानसिक आणि शारीरिक छळ, एकत्र राहण्‍याची इच्‍छा नसणे यामुळे असे विवाह काल्‍पनिक बनतात. अशा प्रकरणांमध्‍ये विवाहाचे पावित्र्य राखले जात नाही. उलट असे विवाह मानसिक क्रूरतेस कारणीभूत ठरतात. त्यामुळे या प्रकरणामध्‍ये घटस्फोटाचा आदेश देण्यास नकार देणे पक्षकारांसाठी घातक ठरेल, असे मत व्‍यक्‍त करत कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने पत्नीची याचिका फेटाळत कौटुंबिक न्‍यायालयाचा घटस्‍फोट मंजुरीचा निर्णय कायम ठेवला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT