Latest

Food Crisis : कांद्याच्या टंचाईमुळे जगावर खाद्य संकटाचा धोका?

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक उलथापालथ सुरू आहे. दरम्यान, जग नव्या अन्नसंकटाकडे वाटचाल करत आहे. अनेक देशांमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. फिलीपिन्समध्ये कांद्याचे भाव चिकनपेक्षा जास्त झाले आहेत. कांद्याचे हे संकट केवळ फिलिपाइन्सच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसरले आहे. कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांनी देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. दुसरीकडे युरोपही अशा संकटातून जात आहे. यूकेच्या अनेक सुपरमार्केटने तीनपेक्षा जास्त टोमॅटो खरेदीवर बंदी घातली आहे. (Food Crisis)

हे नवे खाद्य संकट काय आहे? या संकटाचे कारण काय? या कमतरतेमुळे जागतिक अन्न संकट येऊ शकते का? संकटाची सुरुवात कुठून झाली? भारतात काय परिस्थिती आहे? चला तर मग जाणून घेऊ या… (Food Crisis)

जागतिक अन्न संकटाची चाहूल (Food Crisis)

अनेक देशांमध्ये कांद्याच्या तीव्र टंचाईमुळे जागतिक अन्न संकट उद्भवू शकते, कारण हा तुटवडा आता इतर भाज्यांच्या किमतीत वाढ करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की जगभरात कांद्याचे भाव वाढत आहेत आणि त्यामुळे महागाई वाढत आहे. यामुळे मोरोक्को, तुर्कस्तान आणि कझाकस्तान या देशांना काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी लागली आहे.

फिलीपिन्समध्ये किमती वाढल्यामुळे लोक आता कांद्याचा वापर बंद करत आहेत. दरम्यान, मोरोक्कोची राजधानी रबातमध्ये महागाईमुळे लोक आता कांदा आणि टोमॅटो खरेदी करणे बंद केले आहे. यूकेमध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे, अनेक सुपरमार्केटमध्ये काही फळे आणि भाज्यांच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आले आहे. दक्षिण स्पेन आणि उत्तर आफ्रिकेतील खराब हवामानाचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाल्यामुळे अशी स्थिती उदभवत आहे.
आहे. (Food Crisis)

युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या किमतीतील घट आणि त्यानंतरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गाजर, टोमॅटो, बटाटे आणि सफरचंद यांसारख्या इतर फळे आणि भाज्यांच्या जगभरातील उपलब्धतेवर परिणाम होत आहे. कांदा हा जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे १०६ मिलियन मेट्रिक टन उत्पादन केले जाते, जे गाजर, सलगम, मिरी आणि लसूण यांच्या एकत्रित उत्पादनाच्या बरोबरीचे आहे.

काय आहे संकटाचे कारण?

किमती वाढण्यामागे अनेक कारणे दिली जात आहेत. प्रतिकूल हवामानापासून ते अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांची कारणे या मागे दडली आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानात आलेला विनाशकारी पूर, युक्रेन-रशिया युद्ध ही काही प्रमुख कारणे आहेत. उत्तर आफ्रिकेतही भीषण दुष्काळ, बियाणे आणि खतांच्या उच्च किंमतीमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे मोरोक्कोमधील कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये कांद्याचा मोठा साठा थंड हवामान आणि दवांमुळे खराब झाला आहे.

युरोपियन युनियन देशांमध्ये खराब पिके आणि दुष्काळामुळे जागतिक बाजारपेठेत कांदा आणि इतर भाज्यांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी युरोपातील काही भागांना दुष्काळाचा तडाखा बसला होता आणि जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार असलेल्या नेदरलँडला याचा फटका बसला होता. यामुळेकांद्याच्या किमतीत वाढ झाली आणि जानेवारीच्या अखेरीस ते फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत घाऊक भावाने प्रति किलो ५८ रुपये इतका विक्रमी उच्चांक गाठला.

जागतिक अन्न संकटाची ही आहेत लक्षणे

फिलीपिन्समधील कांद्याच्या तुटवड्याचा गेल्या काही महिन्यांत मीठ आणि साखर यासारख्या मुख्य घरगुती घटकांच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. भाव इतके वाढले आहेत की चिकनपेक्षा कांदा महाग झाला आहे.

कझाकस्तानमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आता परिस्थिती अशी आली आहे की तेथील व्यापारमंत्र्यांनी लोकांना कांद्याची पोती खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. कारण सुपरमार्केटमध्ये कांद्याची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

कझाकिस्तानने किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच देशांतर्गत बाजारात तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. टंचाईच्या भीतीने तुर्कीनेही काही निर्यात थांबवली आहे. आधीच विनाशकारी भूकंपांशी लढा देत असलेल्या या देशातही किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे, अझरबैजान देखील विक्रीवर मर्यादा घालत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कांद्याच्या किमतीत मोठी वाढ होणे हे मोठे आव्हान आहे कारण त्यामुळे पोषक तत्वांनी समृद्ध भाज्या आणि फळांच्या किमती वाढतील. अखेरीस याचा परिणाम गंभीर अन्न संकटावर होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जगातील तीन अब्जाहून अधिक लोकांना सकस आहार मिळत नाही.

फिलीपिन्समध्ये का वाढले कांद्यांचे भाव

फिलीपिन्समध्ये महिन्याला सुमारे १७,००० मेट्रिक टन कांद्याचा वापर होतो. २०२२ मध्ये, तीव्र वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यामुळे तुटवडा निर्माण झाला आणि किमती वाढल्या. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंडिकेट कांद्याची साठेबाजी करत आहेत, त्यामुळे त्याचे भाव वाढत आहेत. आता सरकारने अशा लोकां विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.

कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने तस्करी वाढली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, अधिकाऱ्यांना आयात केलेल्या पेस्ट्री आणि ब्रेडमध्ये लपवलेले ५० हजार किलो कांदे सापडले. एका अहवालानुसार, २२ आणि २३ जानेवारी रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी झांबोआंगा बंदरावर सुमारे ९.५ मिलियन किमतीचा लाल कांदा जप्त केला.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT