Latest

Rajasthan Sikar gang war : गँगस्टर राजू ठेहटसह दोघांच्या हत्या प्रकणी पाच आरोपींना अटक; सीएम गेहलोत म्हणाले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: राजस्थानच्या सीकरमध्ये शनिवारी (दि.03) झालेल्या गँगवॉरमध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्यांमध्ये गँगस्टर राजू ठेहट याचा समावेश आहे. तो वीर ताज सेना गँगमधील गुन्हेगार आहे. राजू ठेहटच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी सीकर बंदचे आवाहन केले. यानंतर पोलिसांनी या हत्याकांडातील पाच जणांना अटक केल्याची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे.

सीकरमधील हत्याकांडातील आरोपींना २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात राजस्थान पोलिसांना यश मिळाले आहे. या पाच आरोपींना त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि वाहनांसह अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर लवकरात लवकर खटला चालवून त्यांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा दिली जाईल, असे ट्विट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

राजू ठेहटच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी सीकर बंदचे आवाहन केले. जोपर्यंत राजूची हत्या करणार्‍यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देणार नाही, असा पवित्रा त्याच्या समर्थकांनी घेतल्याने राजस्थानातील सीकरमध्ये तणाव निर्माण झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने राजू ठेहट याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. रोहित गोदारा नावाच्या युजरने फेसबुकच्या माध्यमातून राजूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हत्याकांडातील आरोपींना झुंझनू जिल्ह्यातील गुढा गावातून अटक केली आहे. हे आरोपी गेल्या एका महिन्यापासून राजू ठेहट यांची रेकी करत असल्याची माहिती राजस्थानचे पोलिस अधिकारी उमेश मिश्रा यांनी दिली. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन या घटनेसंबंधी माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, राजू ठेहट हत्याकांड प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन आरोपी मनीष जाट आणि विक्रम गुर्जर हे सीकरचे रहिवासी आहेत. शिवाय सतीश कुमार, जतीन मेघवाल आणि नवीन मेघवाल हे हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील असून त्यांना या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पोलिसांच्यात झालेल्या चकमकीत एका आरोपीला गोळी लागल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT