Latest

‘फिच’नं घटविला जीडीपीचा अंदाज; पुढील आर्थिक वर्षात विकासदर ८.५ टक्के राहणार

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता, इंधन दरात झालेली वाढ आदी कारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था नरम पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात जीडीपी दर (GDP growth forecast) ८.५ टक्के राहू शकतो, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था 'फिच' ने (Rating agency Fitch) वर्तवला आहे. याआधी फिचने १०.३ टक्के जीडीपी दराचा अंदाज वर्तवला होता. चालू आर्थिक वर्षात हाच दर ८.७ टक्के इतका राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

कोरोनाचे ओमायक्रॉन (Omicron) स्ट्रेनचे संकट कमी झाल्याने विविध प्रकारचे निर्बंध हटविण्यात आलेले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेत गती आली आहे. मात्र इंधनाच्या चढ्या दराचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला आगामी काळात बसू शकतो. याच्या परिणामी जीडीपी दर आधी वर्तवलेल्या १०.३ टक्क्यांच्या तुलनेत १.८ टक्क्याने कमी होऊन ८.५ टक्क्यांवर येऊ शकतो, असे 'फिच'च्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अनेक आशियाई तसेच युरोपियन देशात कोविडचे संकट पुन्हा एकदा वाढत आहे. सप्लाय चेनवर त्याचा परिणाम पडू शकतो, असे सांगून अहवालात पुढे म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडींमुळे महागाई वाढण्याची तसेच विकासदर कमी होण्याची शक्यता वाढली आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या दरवाढीमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल आणि ग्राहकांना वस्तू, सेवांसाठी जास्त किंमत मोजावी लागेल.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एमआयएम चा फुगा | Pudhari Podcast

SCROLL FOR NEXT