Latest

Grassland Safari in pune : राज्यातील पहिली ग्रासलॅन्ड सफारी पुणे जिल्ह्यात; असे करा ऑनलाईन बुकिंग?

अमृता चौगुले

जळोची(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती आणि इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्रातील पहिल्या ग्रासलॅन्ड सफारी वेबसाइटचे उद्घाटन पुणे प्रादेशिक मुख्य वनरक्षक एन. आर. प्रविण यांच्या हस्ते करण्यात आले. वन्यप्राणी सफारीच्या माध्यमातून पर्यटक आणि वन्यजीव प्रेमी तसेच छायाचित्रकार यांना वनक्षेत्रात माळरानावरील निसर्गसौंदर्य व वन्यजीव पर्यटन अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

तसेच बारामती व इंदापूर तालुक्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ही सफारी महत्वाची ठरणार आहे. पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते तसेच सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, आशुतोष शेंडगे, पुणे वनविभाग यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी, राम धोत्रे, ए. एस. सामक, सहायक वनरक्षक दीपक पवार, बारामती तालुका वन विभाग प्रमुख शुभांगी लोणकर, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इंदापूर व बारामती तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांमध्ये वनक्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गवताळ परिसंस्था विकसित झाली आहे. याठिकाणी विपुल प्रमाणात जैवविविधता आढळून येते. या प्रदेशात वनक्षेत्रात पक्षी निरीक्षण व वन्यजीव सफारी सुरू करण्याकरीता पक्षी प्रेमी ची मागणी होती. या परिसरात ३०० पेक्षा जास्त प्राणी, पक्ष्यांच्या प्रजाती वास्तव्यास आहे.

असे करा ऑनलाईन बुकिंग?

या सफारीचे बुकींग ऑनलाइन पध्दतीने www. grarrlandrafari rog या वेबसाइटवर खुले करण्यात आले आहे. वन्यजीव सफारीच्या माध्यमातून वन पर्यटनाला चालना देण्याचा पुणे वनविभागाचा प्रयत्न आहे. येथील वनक्षेत्रात चिंकारा, लांडगा, तरस, ससे, कोल्हा, खोकड यांसह ३०० पेक्षा जास्त माळरानावरील प्राणी, पक्ष्यांच्या प्रजाती देखील आढळून येतात. या ठिकाणी पर्यटक वन्यजीव फोटोग्राफीसह पक्षिनिरीक्षणास देखील येत असतात. ही बाब विचारात घेत या वनक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मिळावी आणि येथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सफारी सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक पुणे यांच्याकडून सांगण्यात आले.

रोजगाराच्या संधी

पर्यटनाच्या दृष्टीने बारामती व इंदापूर तालुक्याला एक आगळेवेगळे स्थान निर्माण होणेकरिता पक्षी निरीक्षण व वन्यजीव सफारी सुरू करणेत येत आहे. तसेच त्यामाध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.स्थानिक ग्रामस्थ, वन्यजीव प्रेमी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने वनविभागाकडे मागणी व पाठपुरावा चालू होता. त्या अनुषंगाने वनविभागाने इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी ग्रासलॅन्ड सफारी चालू करण्यात आली.

राज्य वन्यजीव मंडळ सदस्य अनुज खरे, मानद वन्यजीव रक्षक पुष्कर चौबे, राजीव पंडित व विनोद बारटक्के, अशासकीय संस्था प्रतिनिधी यांनी माळरानावरील परिसंस्था व वन्यजीव पर्यटन विषयक माहिती व अनुभव सांगून सफारी गाईड म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्थानिक गाईड म्हणून बारामती व इंदापूर परिसरातील युवकांना संधी मिळणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT