Latest

Lok Sabha Elections 2024 : भाजप उमेदवार करण भूषण यांच्‍या ताफ्‍याचे ‘गोळीबारा’ने स्‍वागत! व्‍हिडिओ व्‍हायरल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याचे समर्थकांनी हवेत गोळीबार करत स्‍वागत केल्‍याचा व्हिडिओ समोर आला आहे.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले उत्तरप्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवार, ३ मे रोजी त्‍यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज ( दि. ४) सकाळी विष्णोहरपूर येथून ताफा निघाला असून ठिकठिकाणी स्वागताचे कार्यक्रम सुरू होते. ताफा निघाला तेव्हा तारबगंज विधानसभा मतदारसंघातील बेलसर (रगरगंज) मार्केटचा परिसरात गोळीबाहराचा आवाज घुमला. यावेळी पोलिस प्रशासनाने बघ्‍याची भूमिका घेतली.

गोळीबाराचा व्हिडीओ करण भूषण सिंह यांच्‍या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये नवाबगंज नगरपरिषदेचे अध्यक्ष डॉ.सत्येंद्र सिंह व्हिडिओ बनवणाऱ्या समर्थकाला थांबवताना दिसत आहेत. या काळात सातत्याने गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्याचे दिसते.

करणभूषण यांना भाजपचे तिकीट

 बृजभूषण शरण सिंह त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष राहिलेले बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगीता फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या सर्व कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीत धरणे आंदोलनही केले होते. त्यांनतर बृजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.

भाजपने उत्तरप्रदेशातील २७ लोकसभा मतदारसंघात ठाकूर समाजाच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. गाझियाबाद येथून व्ही. के. सिंह यांचेही तिकीट कापण्यात आले. त्यामुळे भाजपविरोधात ठाकूर समाजात प्रचंड नाराजी आहे. या समाजाच्या नेत्यांनी महापंचायत घेऊन भाजपला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापताना भाजपपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.

ठाकूर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर कैसरगंज येथून त्यांचे सुपुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी देण्याचा तोडगा काढला आहे. शुटिंगचे राष्ट्रीय खेळाडू असलेले करण भूषण सध्या उत्तरप्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. वडिलांवरआरोप झाल्यानंतरही ते या पदावर निवडून आले होते. करणभूषण पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT