Latest

औरंगाबाद : जोगेश्वरी शिवारातील साहिल प्लास्टिक कंपनीला भीषण आग, कामगार सुरक्षित

स्वालिया न. शिकलगार

वाळूज महानगर (औरंगाबाद) पुढारी वृत्तसेवा : जोगेश्वरी येथील चटईचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीला आज सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शोर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाळूज एमआयडीसी मधील जोगेश्वरी गावालगत असलेल्या साहिल प्लास्टिक (गट क्रमांक – १८४, एल सेक्टर) या कंपनीत चटईचे उत्पादन घेण्यात येते. या कंपनीत महिला तसेच पुरुष असे एकूण मिळून जवळपास ४०० च्या आसपास कामगार काम करतात. आज सोमवारी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कंपनीचे १०० तर ठेकेदारमार्फत १०० ते १५० असे जवळपास २५० कामगार कंपनीत काम करत होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या पाठीमागे असलेल्या गोडवूनमधून धूर व आगीचे लोळ दिसून आल्याने कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र कंपनीतील प्लास्टिक मटेरियल व चटयांनी पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीनंतर कंपनीतील सर्वं कामगारांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

अवघ्या काही वेळातच आग कंपनीच्या चोहोबाजूंनी पसरल्याने कंपनीतील सर्व तयार माल, मटेरिअल व यंत्रसामुग्री आगीत भस्मसात झाली. या आगीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी व बजाज ऑटो कंपनीचे दोन, गरवारे कंपनीचा एक अग्निशमन बंब तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, आगीची वार्ता परिसरात पसरताच याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे, संदीप शिंदे आदी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत. तीन तास उलटूनही अद्याप आग आटोक्यात आली नाही.

SCROLL FOR NEXT