पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आज (सोमवार) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली. यात पुजार्यांसह १४ भाविक जखमी झाले. काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आठ जणांना इंदूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या आग दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत आणि मोफत उपचाराची घोषणा केली आहे. या संदर्भातील वृत्त 'PTI'ने केले आहे. (Fire in Mahakal Temple)
भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, होळीच्या रंगांपासून संरक्षण करण्यासाठी गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतींवर कापड झाकण्यात आले होते. भस्मआरती सुरू असताना भाविकांकडून 'गुलाल' उधळला जात होता. दरम्यान 'आरतीचे ताट' हातून पडल्यानंतर ही आग लागली. आरतीच्या वातीवर 'गुलाल' फेकल्याने रसायनावर प्रक्रिया होऊन आग लागली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या आग दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत तसेच मोफत उपलब्ध सर्वोत्तम उपचार दिले जातील. तसेच अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Fire in Mahakal Temple)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडलेली घटना अत्यंत वेदनादायक आहे. या घटनेत जखमी झालेल्या सर्व भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली पीडितांना शक्य ती सर्व मदत देण्यात येत आहे." असेही त्यांनी स्पष्ट केले. (Fire in Mahakal Temple)
हेही वाचा: