Latest

नगर: उद्या नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होणार; राहुरीची प्रभागरचना प्रसिद्ध

अमृता चौगुले

नगर: पुढारी वृत्तसेवा

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व देवळाली प्रवरा या नऊ नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीची अंतिम प्रभागरचना तयार झाली आहे. मंगळवारी प्रभागरचना प्रसिध्द होणार होती. परंतु निवडणूक आयोगाने प्रसिध्द करण्यास आणखी दोन दिवसांची मुदतवाढ दिली. त्यामुळे गुरुवारी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेची व नेवासा नगरपंचायतीची प्रभागरचना प्रसिध्द झाली. जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभागरचनेचा कार्यक्रम 22 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केला होता. कार्यक्रम सुरु असतानाच ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक राज्य सरकारने 11 मार्च 2022 रोजी मंजूर केले.

त्यामुळे प्रभागरचनेचे अधिकार सरकारला प्राप्त झाले. त्यामुळे प्रभागरचनेची प्रक्रिया शासनाने थांबवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयोगाने दहा पालिकांच्या प्रारुप प्रभागरचना जाहीर केली. या प्रारुपावर 27 हरकती दाखल झाल्या होत्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोन टप्प्यात हरकतींवर सुनावणी घेऊन क वर्ग पालिकांचा अभिप्राय विभागीय आयुक्त यांच्याकडे तर ब वर्ग पालिकांचा अभिप्राय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे पाठविला.

त्यानंतर 6 जून 2022 पर्यंत अंतिम प्रभागरचनेस मान्यता देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड या नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीच्या प्रभागरचनेस मंजुरी दिली. आयोगाच्या निर्देशानुसार 7 जूनपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होणे आवश्यक आहे. परंतु काही प्रशासकीय कारणास्तव अंतिम प्रभागरचना 9 जून रोजी प्रसिध्द करा, असे निर्देश आयोगाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना गुरुवारी प्रसिध्द होणार आहे.

आता आरक्षण सोडतीकडे लक्ष

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, राहाता व देवळाली प्रवरा या नगरपालिकांची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपली. नेवासा नगरपंचायतीची मुदत जून महिन्यात संपणार आहे. सध्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त आहे. अंतिम प्रभागरचना तयार झाल्यानंतर आता आरक्षण कार्यक्रमाची प्रतीक्षा राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे.

नेवाशात एक प्रभाग एक नगरसेवक

नगरपालिकांच्या एका प्रभागमधून दोन नगरसेवक निवडून जाणार आहे. नेवासा नगरपंचायतीसाठी 17 प्रभाग असणार आहेत. एका प्रभागमधून एकच नगरसेवक निवडला जाणार आहे.

https://youtu.be/7KwsutS10qQ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT