Latest

कर्जत पोलिसांचा ‘फिल्मी स्टाईल’ तपास; बेपत्ता युवकाचा मध्य प्रदेशमध्‍ये घेतला शोध

अमृता चौगुले

कर्जत; गणेश जेवरे : घरामध्ये किरकोळ वाद होतो, मात्र तो सहन न झाल्याने त्याक्षणी घर सोडून थेट मध्य प्रदेश गाठलेल्या युवकाचा शोध कर्जत पोलिसांनी अगदी चित्रपटाला साजेल असा लावला आहे. हा तपास करताना कर्जत ते मध्य प्रदेश हा शेकडो मैलचा प्रवास, बंद मोबाईलचे लोकेशन स्ट्रेस करणे, स्थानिक अडथळे पार करणे, परराज्यातील शहरामध्ये घरघरा जाऊन चौकशी करणे अशा पद्धतीने अंगावर शहारे आणणारा फिल्मी स्टाईल तपास कर्जत पोलिसांनी केला. यामुळे कर्जत पोलिसांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, 'कर्जत येथे राहणारा १९ वर्षीय युवकाचे किरकोळ कारणावरून घरातील व्यक्तींशी वाद झाला. हा वाद त्याने इतका मनाला लावून घेतला की त्याने आपले राहते घरच सोडले. रागाच्या भरात कुठे गेला ? कुणाकडे गेला ? कुणालाच काही माहीत नाही. कुटुंबातील व्यक्तींनी नातेवाईक, मित्र-परिवार सगळीकडे चौकशी व शोधाशोध केली. शेकडो फोनकॉल फिरले, मात्र काहीही तपास लागला नाही. आता सगळे पर्याय थांबले होते. ही घटना कर्जत पोलीस ठाण्यापर्यंत गेली. कुटुंबियांकडून मुलगा हरवल्याची तक्रारही दाखल केली. कुटुंबातील व्यक्तींच्या मनात असलेली काळजी, भीती, संशय हे सगळं पोलीस निरीक्षक यादव यांनी पाहिलं. 'काळजी करू नका मी बघतो' हे  त्यांचं वाक्य कुटुंबीयांना दिलासा देणारं होतं.

यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. बेपत्ता युवक इंदौर (मध्य प्रदेश) मध्ये असल्याची माहिती मिळाली. नेमके काय झाले असावे ? मुलगा सुखरूप आहे की नाही ? त्याच्याबरोबर काय अनर्थ तर घडला नसेल ना ? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना तोंड फुटत होते. या सर्व आव्हानाला तोंड देत किचकट तपासाचा 'यादव पॅटर्न' खऱ्या अर्थाने सुरु झाला होता.

यादव यांनी मिळालेल्या माहितीवर तात्काळ पोलीस पथक रवाना केले. तपासात असे आढळून आले की, युवक हा दौंड येथून रेल्वेने इंदौर येथे पोहोचला होता. याच रेल्वे प्रवासात नव्याने झालेल्या ओळखीच्या आधारे त्याच शहरातील कंपनीत तो काम करत होता. मोबाईल बंद करून त्या ठिकाणी तो राहत होता. कर्जत पोलिसांनी संपूर्ण शहरात शोध मोहीम सुरू केली. स्थानिक दुकानदार, हॉटेल आदींकडे फोटो दाखवून कसून चौकशी केली. या चौकशीत हा युवक संबंधित ठिकाणी राहत असल्याची खात्री झाली. त्यानंतर या तपासास अधिक गती देऊन होम-टू-होम चौकशी करण्यात आली. या चौकशीत हरवलेल्या युवकाला शोधण्यात कर्जतच्या पथकाला यश आले. आता तपास थांबला होता. पिथमपुर येथून त्या युवकाला कर्जत येथे आणण्यात आले. युवकाला कुटुंबियाच्या ताब्यामध्ये देतात सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक संभाजी वाबळे, अर्जुन पोकळे आदींनी केली आहे.

कर्जत पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक

'चित्रपटामध्ये अभिनय करताना हरवलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवून त्याचा शोध घेतला जातो. विशेष म्हणजे चित्रपटातील हरवेलेली व्यक्ती काही मिनिटात सापडते. मात्र कर्जत पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन दुकाने, इतर व्यावसायिक, प्रत्येक घराघरात फोटो दाखवून माहिती घेतली. बेपत्ता युवकाचा मोबाईल बंद असूनही शेवटच्या लोकेशनवरुन सुरू असलेली शोधमोहीम तपासानंतरच थांबली, हा सर्व प्रसंग अगदी चित्रपटाला साजेल असाच होता. त्यामुळे पोलिसांनी फक्त मनावर घेतले तर काय करु शकतात हे त्यांनी दाखवून दिले. या विशेष तपास मोहिमेमुळे कर्जत पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT