Latest

FIFA WC Violence: मोरोक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, दंगलीत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC Violence : फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफयनलमध्ये मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी युरोपमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंसाचार घडवून आणला. सामना संपल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये येथे चाहते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एकच धुमाकूळ घालून जाळपोळ केली. दरम्यान, दक्षिण फ्रान्सच्या माँटपेलियर शहरात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत मुलाची ओळख पटलेली नसून एका कारच्या धडकेत त्याला जीव गमवावा लागल्याचे स्थानिक पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

साखळी फेरी ते सेमीफायनपर्यंत धडक मारणा-या मोरोक्को संघाने एकापाठोपाठ एक उलटफेर केले. बेल्जियम, स्पेन, पोर्तुगाल अशा युरोपमधील दिग्गज संघाना नमवून चकित करणारा मोरोक्कोचा संघ अचानक विजेतेपदाचा दावेदार बनला होता. पण सेमीफायनमध्ये फ्रान्सने 2-0 असा विजय मिळवत मोरोक्कन चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. स्पर्धेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पहिलाच सामना गमावल्याने या चाहत्यांना हार पचवता आली नाही आणि त्यांनी हिंसक वर्तन केले. (FIFA WC Violence)

ब्रुसेल्सच्या साउथ स्टेशनवर मोरोक्कनचे चाहते जमले एकत्र आले आणि त्यांनी अचानक जाळपोळ सुरू केली. जमावातील काहींनी तर पोलिसांवर फटाके आणि इतर वस्तूही फेकल्या. कचऱ्याच्या पिशव्या आणि पुठ्ठ्याचे बॉक्स पेटवून दिले. हा हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. या चकमकींमध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती असून ते गंभार नसल्याचे स्मजते आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक चाहत्यांना ताब्यातही घेण्यात आले. (FIFA WC Violence)

फ्रान्समधील पॅरिसमध्येही मोरोक्कन चाहत्यांनी गोंधळ घातला. एकीकडे फ्रेंच चाहते आपल्या संघाच्या विजयाचा रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करत होते आणि त्याचवेळी मोरोक्कन चाहते समोर आले. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांशी भिडले. यातूनच फ्रेंच-मोरोक्कन चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या. यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. रात्री उशिरा झालेल्या या घटनांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आला. याआधी 10 डिसेंबरला पॅरिसमध्ये अनेक ठिकाणी अशाच हिंसाचा-याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव केल्यानंतर मोरोक्कन चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सवाच्या भरात धुमाकूळ घालून जाळपोळ आणि पोलिसांना मारहाण केली होती. (FIFA WC Violence)

फ्रान्‍स सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत

शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशा गोल (France vs Morroco) फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्ससाठी थियो हर्नांडेझने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर ७९ व्या मिनिटाला रँडल कोलो मुआनीने गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. मोरोक्कोला सामन्यात एकही गोल करता आला नाही. यामुळे त्यांचा फ्रान्सने २-० ने पराभव केला. फ्रान्‍सने सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात फ्रान्सचा मुकाबला अर्जेंटिनाशी होणार आहे. हा सामना रविवारी (दि १८) रोजी रात्री ८.३०ला सुरु होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT