Latest

बीड : धक्कादायक! मुलगी नको म्हणून गर्भ कापून बाहेर काढला; चौघांवर गुन्हा दाखल

मोनिका क्षीरसागर

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : 'मुलगी नको, मुलगाच हवा' या हट्टापायी कुटुंबाने एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचणी केली. यानंतर मुलगीच आहे हे लक्षात आल्याने पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरने गर्भ कापून पोटातून बाहेर काढला. या प्रकरणातील पीडित मातेच्या फिर्यादीवरून सासू, पती व डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी एका मुलीला जन्म दिलेली विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. पण दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा असा अठ्ठास धरला. या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरत, बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ कापून पोटातून बाहेर काढला. माझ्या बाळाला मारू नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही डॉक्टरने दुर्लक्ष केले. यानंतर या मातेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीनुसार, २०२० साली पीडितेचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे यांच्याशी झाले. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिला मारहाण, शिवीगाळ करून तिचा छळ करत असतं. तिला माहेरच्या कोणाशीही बोलू देत नसतं. दरम्यान, मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर यावर्षी ती पुन्हा गर्भवती राहिली. यावेळी मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने तिच्याकडे धरला. सोनोग्राफी करू या. मुलगी असेल तर काढून टाकूया, असे पीडितेच्या घरचे वारंवार तिला टॉर्चर करतं. पीडितीने याला वारंवार विरोध केला होता. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंग निदानासाठी डॉ. स्वामी यांच्याशी संपर्क केला होता. यानंतर डॉ. स्वामी यांनी सोनोग्राफी मशीन घरी घेऊन येत, संबंधित पिडितीची गर्भलिंग निदान चाचणी केली होती.यानंतर त्याने मुलगी असल्याचे तिच्या घरातल्यांना सांगितले.

शनिवारी (दि.१६) पहाटे १.३० वा. डॉ. स्वामी हे पुन्हा पीडितेच्या घरी आला. त्याने पुन्हा तिची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असे त्याने सांगितले. यावेळी देखील गर्भपात करू नका अशी विनवणी पीडितेने घरच्यांना आणि डॉक्टरला केली, पण सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला.

चौघांवर गुन्हा दाखल

शनिवारी (दि.१६) सकाळी पीडितेचा भाऊ तिच्या घरी आला. यानंतर त्याने बहिणीचा पती, सासू यांना विनंती करून रात्री तो बहिणीला घेऊन पुण्याला गेला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात पोलिसांना माहिती देत फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३१३, ३१५, ३१८, ३४, ४९८-अ, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT