नगर : बीड जिल्ह्यातील मांडवा (ता. आष्टी) या छोट्याशा खेडेगावातील शेतकर्याचा मुलगा असलेल्या अविनाश साबळेने चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाल्याचे आई वैशाली मुकुंद साबळे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले. त्यांनी सांगितले की, मुलगा काहीतरी खेळतोय हे फक्त माहिती आहे, आम्ही दोघेही आडाणी असल्याने त्याचे हे यश किती मोठे आहे आणि त्याने काय केले, यापेक्षा गरीब शेतकर्याच्या मुलाच्या कष्टाला आलेले यश कितीतरी मोठे आहे. भारताचा स्टार धावपटू अविनाश साबळे याने भारताला मोठे यश मिळवून दिले असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रीय विक्रम करणार्या या 29 वर्षीय खेळाडूने सध्या सुरू असलेल्या आशियाईमध्ये अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आाहे. त्याने ही शर्यत विक्रमी 8 मिनिटे 19.50 सेकंदात पूर्ण केली असून, त्याने 2018 मध्ये इराणच्या हुसेन केहानीने केलेला विक्रम मोडीत काढत 3000 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ही कामगिरी केली आहे.
अविनाश साबळेने 8:19:53 मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेतील भारताचे हे 12 वे सुवर्णपदक आहे. आई वैशाली साबळे यांनी सांगितले की, आष्टी तालुक्यातील मांडवा गावात शेतकरी कुटुंब असून, लहानपणापासूनच त्याला धावण्याची आवड होती. गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. शाळा शिक्षण्यासाठी आणि आपली खेळातील आवड टिकविण्यासाठी त्याने आमच्या बरोबर वीटभट्टीवर ही काम केले आहे. खूप हलाखीची परिस्थिती त्याने पाहिली आहे. तो लहानपाणपासूनच हुशार होता. त्याला खेळाची आवड होती.
मांडवा गावात आनंदाचे वातावरण
मांडवा गावात आनंदाचे वातावरण असून, त्याच्या कुटुंबाला दुपारीच ही बातमी समजताच आनंद व्यक्त केला. कुटुंबातील एका मुलाने त्यांना ही माहिती दिली आहे. मात्र, वडील दुसर्या गावी गेलेले असल्याने त्यांना आल्यानंतरच ही माहिती मिळणार आहे. अशी या साबळे कुटुंबीयांची कहाणी आहे.
दुपारीच आईशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले. मी आईला सांगिले की, माझा आज राऊंड आहे. आईला विचारले तुम्ही कसे आहात आणि वडील काय करतात.
-अविनाश साबळे, आशियाई सुवर्णपदक विजेता