भंडारा; पुढारी वृत्तसेवा : Farmers Agitation मागील खरीपाचा पूर्ण बोनस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अर्धाच बोनस मिळाला. रब्बी धानाचे चुकारे अजून झाले नाही. तसेच नियमीत कर्जदार शेतक-यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा हवेत विरली. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात मंगळवारी चक्क लाखांदूरच्या तहसील कार्यालयाचा लिलाव केला. ४ हजार १०० रुपयात तहसील कार्यालयाचा लिलाव करण्यात आला. लिलावातून मिळालेले पैसे शेतक-यांनी आपसात वाटून घेतले.
राज्य शासनाने धानाला ७०० रुपयांचे बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतक-यांना केवळ ५० टक्के बोनस देण्यात आला.
दोन महिन्यापासून धानाचे चुकारे मिळाले नसताना विकासपुरुष आणि भूमिपुत्र म्हणवून घेणाºया नेत्यांकडून शेतक-यांना तारखावर तारखा दिल्या जात आहेत. या नेत्यांकडून केवळ राजकारण केले जात असून, शेतक-यांची दिशाभुल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार अखिलभारत मेश्राम व पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन यंत्रणेसोबत संपर्क केला. मात्र, त्यानंतर थेट तहसील कार्यालयाच्या लिलावाला सुरुवात केली.
अनामत रक्कम भरण्यात आल्यानंतर १ हजार १ रूपयावरून बोली लावण्यात आली. रविंद्र चुटे नामक शेतक-याने ४ हजार १०० रूपयात तहसील कार्यालय घेतले.
निखीव कावळे नामक शेतक-याच्या मुलाची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली व शेतक-यांना पोळा सण साजरा करता यावा यासाठी लिलावातून मिळालेले पैसे शेतक-यांना वाटप करण्यात आले.
त्यानंतर तहसिलदार अखीलभारत मेश्राम यांनी आठ दिवसात शेतक-यांच्या धानाचे चुकारे देण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी, उपप्रमुख धनराज हटवार, विधानसभा प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले.
यावेळी महिला आघाडी अध्यक्षा प्रमिला शहारे, जिल्हा उप प्रमुख दुधराम बावनकर, जनसंपर्क प्रमुख खेमराज भुते, लाखांदुर तालुका महिला अध्यक्षा हेमलता लांजेवार, छाया शेंडे, पवन राऊत, शुभम लांडगे, युवा प्रमुख आदेश शेंडे, शहर प्रमुख अरविंद राऊत, रवि धोटे, दिलीप रामटेके, धनराज कापगते, अरून घोडीचोर, विकास मातेरे, नानाजी लोणारे, गोपाल झोडे, प्रवीन तोंडरे, अशोक बोरकर, निखील कावळे, ईश्वर होंने, काशिनाथ हत्तीमारे, पतीराम झोडे, लालचंद बुद्धे, गुणवंत भुरे, जयश्री ब्राम्हणकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.