मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा मंगळवारी रात्री ११ च्या सुमाराच श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील वर्षी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झालेली होती.
बप्पी लहरी यांना सोन्याचे दागिने घालणे आणि डोळ्यांवर कायम चश्मा लावणे त्यांना पसंत होते. गळ्यात जाड सोन्याच्या चेन्स, बोटांमध्ये सोन्यांच्या अंगठ्या घालणं त्यांना आवडत होते. अंगावरील दागिन्यांमुळेही त्यांची वेगळी ओळख होती. बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांना बाॅलिवुडचा पहिला राॅक स्टार असंही संबोधलं जात होतं.
त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये झाला होता. बप्पी लहरी यांना दोन मुले आहेत. या महिन्यात संगीतविश्वाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर मंगळवारी गायक बप्पी लहरींचे झाल्याने बाॅलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
१९८२ मध्ये आलेला चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट 'डिस्को डान्सर'मुळे बप्पी यांचे करिअर बहरले. या चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. 'नमक हलाल, शराबी, हिम्मतवाला, साहेब, गुरू, घायल आणि रंगबाज' यासारख्या चित्रपटांना संगीत दिले.
२००० नंतरदेखील चित्रपटांमध्ये ते सक्रिय आहेत. 'टॅक्सी नंबर 9211,' 'द डर्टी पिक्चर,' 'हिम्मतवाला,' 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'व्हाय चीट इंडिया' या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं.