Latest

Fadnavis vs Thackeray | ‘बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…’, फडणवीसांचा ठाकरेंना इशारा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराबद्दल आम्ही बोललेलो नाही. आम्ही बोललो तर तुम्हाला तर फक्त शवासन कराव लागेल. त्यामुळे परिवाराबद्दल बोलू नका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आज (दि.२४) लगावला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे!" असं म्हणत जोरदार प्रत्त्युतर दिले आहे. (Fadnavis vs Thackeray)

Fadnavis vs Thackeray : परिवार तुम्हाला सुद्धा आहे : उद्धव ठाकरे

'विरोधकांची पाटणा बैठक ही परिवार बचाव बैठक आहे,' अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.२२) केली होती.  त्यांच्या टीकेला आज (दि.२४)  मुंबई येथे शाखाप्रमुखांच्या आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. "देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराबद्दल आम्ही बोललेलो नाही. आम्ही बोललो तर तुम्हाला तर फक्त शवासन कराव लागेल. त्यामुळे परिवाराबद्दल बोलू नका, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

…संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब : फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत द्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये  म्हटल आहे की, "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या 'व्हॉटसअ‍ॅप चॅट' बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी 'बालबुद्धी' असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर… मुंबईला कुणी लुटले यावर… मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर… मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर… 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर… तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे 'नड्डे' केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते… असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT