मुंबई: पुढारी वृत्तसेवा : रायगड येथे ल्युब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी एक्सॉनमोबिल (ExxonMobil) ही कंपनी सुमारे 900 कोटींची गुंतवणूक करणार आहे. रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा आज (दि. ४) कंपनीचे व्यवस्थापक मॉन्टे डॉब्सन यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतातील वाढत्या ल्युब्रिकंट्सच्या मागणीस मदत करण्यासाठी नवीन प्लांट दरवर्षी 159,000 किलोलीटर ल्युब्रिकंट्स तयार करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्पादन, पोलाद, उर्जा, खाणकाम आणि बांधकाम, तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक क्षेत्रांमधील वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक 159, 000 किलोलिटर ल्युब्रिकंट्स तयार करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असेल. 2025 च्या अखेरीस या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची (ExxonMobil) अपेक्षा आहे.
आम्हाला आमच्या पहिल्या ग्रीनफिल्ड गुंतवणुकीबरोबर भारताप्रती असलेली आमची दीर्घकालीन वचनबद्धता अधिक दृढ करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आकर्षक गुंतवणुकीच्या वातावरणामुळे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे. आणि आमच्या ल्युब्रिकंट्स प्लांटसाठी नैसर्गिक उत्तम पर्याय आहे, असे मॉन्टे डॉब्सन म्हणाले.
मेक इन इंडिया उपक्रमाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, प्लांट बेस स्टॉक, अॅडिटीव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात देईल. बांधकामाच्या टप्प्यात सुमारे 1, 200 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
भारतातील उच्च-कार्यक्षमता ल्युब्रिकंट्स पुरवठादारांपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे एक बदलाचे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने आमची पुरवठा साखळी सुलभ होईल. ज्यामुळे आम्हाला आमच्या भारतीय ग्राहकांच्या आणि उपभोक्त्यांच्या गरजा अधिक सहजतेने पूर्ण करता येतील. भारताच्या विस्ताराच्या कक्षेला पाठिंबा देण्याच्या आमच्या वाढत्या भूमिकेबद्दल आम्ही उत्साहित आहोत, असे एक्सॉनमोबिलचे सीईओ विपिन राणा म्हणाले.
ल्युब्रिकंट्स तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य ब्रँड म्हणून, ExxonMobil ची Mobil-ब्रँडेड इंजिन ऑईल, ग्रीस आणि ल्युब्रिकंट्स यांची विस्तृत श्रेणी अनेक दशकांपासून भारताच्या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी ऊर्जा कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा वाढवत आहे. कंपनी भारताचा द्रवीभूत नैसर्गिक वायूचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे आणि तिची रासायनिक उत्पादने भारतीय उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
हेही वाचा