Latest

ENG vs AUS Ashes 2023 : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ३ विकेट राखून विजय

Shambhuraj Pachindre

हेडिंग्ले; वृत्तसंस्था : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेतील आपले आव्हान 2-1 असे जिवंत ठेवले आहे. रविवारी संपलेल्या तिसर्‍या कसोटीत चौथ्या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 3 विकेटस्नी विजय मिळवला. मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. (ENG vs AUS Ashes 2023)

हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसर्‍या डावात एकही विकेट न गमावता 27 धावा केल्या होत्या, मात्र चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचा डाव गडगडला. मिचेल स्टार्कने भेदक मारा करीत 5 विकेटस् घेऊन इंग्लंडला चांगलेच अडचणीत आणले, पण हॅरी ब्रुकने (75 धावा) एक बाजू नेटाने लढवून इंग्लंडचा विजय निश्चित केला. (ENG vs AUS Ashes 2023)

इंग्लंडने चौथ्या दिवसाची सुरुवात बिनबाद 27 धावसंख्येवरून पुढे केली. मिचेल स्टार्कने बेन डकेटला (23) पायचित करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर 18 धावांतच स्टार्कने मोईन अलीच्या (5) रूपाने दुसरा धक्का बसला. पहिल्याच सत्रात जॅक क्रॉलीही 44 धावा करून बाद झाला.

जॅक क्रॉली बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि जो रूट यांच्यातील भागीदारी बहरली, पण 131 धावांवर जो रूटच्या रूपाने इंग्लंडला चौथा धक्का बसला. रूट 21 धावा करून बाद झाला. ब्रुक आणि रूट यांच्यात 38 धावांची भागीदारी झाली. जो रूटला पॅट कमिन्सने तंबूत पाठवले. बेन स्टोक्स यावेळी फारशी चमक दाखवू शकला नाही. 13 धावांवर स्टार्कने त्यालाही परत धाडले. स्टार्कने जॉनी बेअरस्टो (5) याचा त्रिफळा उडवला, पण ऑस्ट्रेलियासाठी खरी डोकेदुखी होता तो हॅरी ब्रुक. त्याने 67 चेेंडूंत अर्धशतक झळकावले. ब्रुक आणि वोक्सने सातव्या विकेटसाठी 62 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली. ही जोडी इंग्लंडचा विजय साकारणार असे वाटत असताना स्टार्कने ब्रुकला बाद करून आपला पाचवा बळी नोंदवला. ब्रुकने 93 चेंडूंत 75 धावा केल्या. यानंतर मात्र ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांनी सावध फलंदाजी करून उरलेल्या 21 धावा जोडल्या. स्टार्कला चौकार ठोकून वोक्सने विजय साजरा केला.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT