Latest

याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण हे दुर्दैवी : अंबादास दानवे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे दुर्दैवी आहे. कोणाच्या काळात झाले किंवा कोणी माफी मागावी हे व्यर्थ आहे. दहशतवादी याकूबच्या कबरीवर सोन्याचा मुलामा देणे हे निषेधार्थ आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना कबरीचे उद्दातीकरण हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकरणांची सत्तेशी सांगड घालू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमन याला दोषी धरून विशेष टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. 30 जुलाई 2015 ला सकाळी 6.30 वाजता त्याला फाशी देण्यात आली होती. नंतर याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला होता. मरीन लाइन्स येथील बडा कबरस्तान येथे त्याचा त्याच्या कुटुंबियांकडून अंत्यविधी करून दफन करण्यात आले होते. आता त्याच्या या कबरीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले असून कबरी भोवती मार्बलने सजवून त्याला लायटिंग करण्यात आली आहे. तसेच फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे, असे फोटोत दिसत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस भाजपच्या आमदारांनी एकमेकांवर टीका करणे सुरू केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमदार राम कदम यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात याकूबच्या कबरीवर मझारमध्ये रुपांतर झाले. हेच आहे का त्यांचे मुंबईवरील प्रेम आणि देशभक्ती असा सवाल करत त्यांनी शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT