Latest

Bareilly Uttar Pradesh | डंपरल्या धडकल्यानंतर कार झाली सेंट्रल लॉक, आगीत ८ वऱ्हाडींचा होरपळून मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील भोजीपुरा भागात बरेली- नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भोजीपुरा पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर एका डंपरला धडकल्यानंतर कारला आग लागली. त्यामुळे ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एकाच मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. रात्री अडीचच्या सुमारास सर्व मृतांची ओळख पटली. (Bareilly Uttar Pradesh)

कारमधील लोक बरेली शहरातील एक लग्न समारंभ उरकून बहेडीला परतत होते. यादरम्यान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून मृतदेह कारमधून बाहेर काढले. याबाबतच कळताच मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.

बरेलीच्या भोजीपुरा येथे नैनिताल महामार्गावर डंपरला धडक दिल्यानंतर कारला आग लागली. यावेळी त्याचे सेंट्रल लॉकही अडकले. यामुळे डंपरमध्ये अडकलेली कार जळून खाक झाली. कोणालाही कारमधून बाहेर पडता आले नाही. गाडीच्या आत अडकलेल्या लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण सेंट्रल लॉकमुळे ते गाडीतच अडकून पडले. यामुळे सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.

कार सुमारे पाच फूट उंच दुभाजकावर चढून विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला धडकली. डंपरही भरधाव वेगाने होता. त्यामुळे कार फरफटत २५ मीटरपर्यंत पुढे नेली. यावेळी कारने पेट घेतला आणि ती डंपरमध्ये अडकली.

या अपघातादरम्यान कारमधील सेंट्रल लॉक उघडले नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे कारमधील प्रवासी आत अडकून पडले. यातील बहुतांश लोकांनी उबदार कपडे घातले होते. त्यामुळे आगीच्या ज्वाळांनी त्यांना वेढले. अग्निशमन दलाने पाणी फवारणी केली. पण तोपर्यंत सर्वांना मृत्यूने गाठले होते.

सुमारे ४५ मिनिटांनंतर आग नियंत्रणात आली. पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. कारमधून मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. रात्री १ वाजता त्यांचे मृतदेह बाहेर काढले. बहुतांश मृतदेहांची राख झाली होती.

मध्यरात्री ही घटना घडली. त्यात कडाक्याची थंडी असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या डभौरा गावात याची माहिती मिळाली नाही.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT