मुंबई; पुढारी ऑनलाईन
भोंग्यासाठी (loudspeakers) असलेल्या ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पत्र मनसे कार्यकर्ते घरोघरी वाटत आहेत. दरम्यान, चेंबूर परिसरात राज ठाकरेंचे पत्र घरोघरी वाटप करणाऱ्या मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना (MNS workers) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यभर वातावरण तापविले होते. याचे पडसाद उत्तर प्रदेशात सुद्धा उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहून भोंग्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे पत्र कार्यकर्त्यांनी राज्यात घराघरात जाऊन द्यावे, असे आवाहन ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते.
मशिदीवरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. आपला विचार लोकांपर्यंत पोहचायला हवा, व्यापक लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही, माझं पत्र घराघरात पोहचवा, असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती आणि भोंगे उतरवण्यासाठी ४ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ९२ टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते.
सर्वात महत्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यामुळे तर जनता होरपळली आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरूप धारण करताना दिसत आहे.
हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. जसा हा भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू, असा मला विश्वास आहे. एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया! असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.